Ajra Urban Bank election unopposed | आजरा अर्बन बँक निवडणूक बिनविरोध

आजरा अर्बन बँक निवडणूक बिनविरोध

ठळक मुद्देआजरा अर्बन बँक निवडणूक बिनविरोध उद्या होणार अधिकृत घोषणा, सभासदांमधून समाधान

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १८ जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उद्या (बुधवारी) दुपारी ३ वाजता आजरा येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोधची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या बँकेची स्थापना केली. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेली ही बँक अल्पावधीत महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक म्हणून नावारूपाला आली.

आजरा, कोल्हापूरसह कोकण आणि पुणे, मुंबई, कर्नाटकात असलेल्या शाखा, मल्टिस्टेटचा मिळालेला दर्जा या सर्व पार्श्वभूमीवर बँकेने आजरा तालुक्याच्या विकासात मोठी भूमिका बजावली. याच बळावर जनता शिक्षण संस्था आणि आण्णा भाऊ सूतगिरणी स्थापन करण्यात आली.

काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांच्या निधनानंतरची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होती. पहिल्या दोन निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. परंतु, आण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी यांनी एकहाती निर्णय घेत सत्तारूढ आघाडीची रचना केली.

विरोधी तीन इच्छुक छाननीमध्ये अपात्र ठरले आणि सोमवारी अर्ज माघारीदिवशी १८ जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे चराटी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ आघाडीने अतिशय सफाईदारपणे ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले. यावेळी विभागीय उपनिबंधक अरूण काकडे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. काकडे आता बुधवारी दुपारी ३ वाजता बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करतील.


सभासदांच्या पाठबळामुळेच बिनविरोध


आजरा अर्बन बँकेचे हजारो सभासद आणि माझ्या सहकाऱ्यांच्या पाठबळावरच ही निवडणूक आम्ही बिनविरोध करू शकलो. याच बळावर आम्ही बँकेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळातदेखील सर्वांच्या सहकार्याने बँक शेड्युल्ड करण्याचा आमचा मानस आहे.
- अशोक चराटी
प्रमुख, आण्णा भाऊ संस्था समूह, आजरा

 

आजरा अर्बन बँक दृष्टीक्षेपात

  • भागभांडवल १७ कोटी ४६ लाख रुपये
  • स्वनिधी ७८ कोटी ४० लाख रुपये
  • ठेवी ७०६ कोटी ४० लाख रुपये
  • कर्जे ३८७ कोटी ८८ लाख रुपये
  • गुंतवणूक ३८२ कोटी ८० लाख रुपये
  • ढोबळ नफा १२ कोटी २३ लाख रुपये
  • सभासद ३३,१६४
  • शाखा ३२ 

Web Title: Ajra Urban Bank election unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.