स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: पंचवीस वर्षांपासून कोल्हापुरातील अजित दरेकर करतात दारात ध्वजवंदन
By संदीप आडनाईक | Updated: August 9, 2022 16:05 IST2022-08-09T16:05:14+5:302022-08-09T16:05:49+5:30
अजित दरेकर यांचे स्वप्न यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साकारणार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: पंचवीस वर्षांपासून कोल्हापुरातील अजित दरेकर करतात दारात ध्वजवंदन
संदीप आडनाईक
कोल्हापूर : स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी प्रत्येक नागरिक घराच्या दारात गुढीप्रमाणेच तिरंगा ध्वज उभारतील, असे कोल्हापूरच्या अजित दरेकर यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साकारणार आहे. स्वत: दरेकर गेल्या पंचवीस वर्षांपासून घराच्या दारात तिरंग्याला अभिवादन करण्याची परंपरा जपतात. यासंदर्भातील 'माझा अभिमान' या ऐश्वर्य मालगावे यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओला प्रतिसाद मिळत असून यंदा तो जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 'हर घर तिरंगा' या मोहिमेंतर्गत व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार यंदा स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' ही मोहीम देशभर राबविली जात आहे. मात्र वैयक्तिकपणे हीच मोहीम ४८ वर्षीय अजित दरेकर गत पंचवीस वर्षांपासून स्वत:च्या घरापासून राबवत आहेत. शिवाजी पेठेत संगणक शिकवणारे दरेकर यांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला फक्त शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणीच ध्वजवंदन का केले जाते, घरोघरी का होत नाही, असा प्रश्न पडायचा. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जिल्हाधिकाऱ्यांनी घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले आणि ध्वजसंहितेचे पालन करत १९९७ पासूनच दरवर्षी निवृत्ती चौकातील कौलारू घराच्या दारात ध्वजारोहण करून तिरंग्याला अभिवादन करण्यास त्यांनी प्रारंभ केला.
'माझा अभिमान' व्हिडीओला प्रतिसाद
शाहूंसाठी ‘वंदन लोकराजाला, शंभर सेकंद कृतज्ञतेचे’ हा व्हिडीओ करणाऱ्या कल्पक संगीतकार ऐश्वर्य मालगावे यांनी कॅमेरामन हरीश कुलकर्णी, विक्रम पाटील, अमन सिन्हा, तसेच शेखर गुरव, देवयानी जोशी, वैष्णवी शानभाग, सचिन शानभाग यांच्या मदतीने गतवर्षी दरेकर यांच्या या कामगिरीचा 'माझा अभिमान' या नावे व्हिडीओ तयार केला आणि यूट्यूबवरून प्रसारित केला. त्याला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यंदा नव्याने संपादित केलेला दरेकर यांचा हा व्हिडीओ 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत प्रसारित होत आहे.
गुढीपाडव्यादिवशी जसे असते, तसेच वातावरण या दिवशी माझ्या घरी असते. आई, वडील, पत्नी, मित्र या उत्सवात सहभागी होतात. शेजारच्या प्रा. मानसी दिवेकर याही प्रेरणादायी कथा सांगतात. दरवर्षी मी हे करतो, पण इव्हेंटचे स्वरूप येऊ दिले नाही. गुढीची काठीवर खादी भांडारमधून आणलेल्या तिरंग्याला उंच उभा करून अभिवादन करतो, राष्ट्रगीत स्वत:च गातो. त्यानंतर यथाशक्ती जिलेबी वाटतो. -अजित दरेकर,