ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:37 IST2017-10-17T00:37:40+5:302017-10-17T00:37:44+5:30

ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने सोमवारी मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. न्यायालयाने या संपाला स्थगिती दिली असली, तरी कोणत्याही परिस्थितीत संप होणारच, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
कृती समितीत महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, एस. टी. वर्कर्स कॉँग्रेस (इंटक), विदर्भवादी कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलक कर्मचाºयांना न्याय हक्कांसाठी संपात सहभागी व्हा, असे आवाहन करीत होते. ऐन दिवाळीत संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
खासगी बसेसची दरवाढ....
ऐन दिवाळीत एस.टी कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उपसल्याने पुणे-मुंबईकडे जाणाºया व येणाºया खासगी वाहनांनी आपल्या तिकीट दरात वाढ केल्याचे चित्र सोमवारी रात्री दिसत होते. पुण्याला जाण्यासाठी ४०० ते ७०० रुपये तर मुंबईला जाण्यासाठी ६०० ते १२०० रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. त्यामुळे प्रवाशांना संपाचा चांगलाच आर्थिक फटका बसला.