रायफलने डोक्यात गोळी घालून एअरमनची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:02 IST2020-07-03T19:00:00+5:302020-07-03T19:02:22+5:30
एका एअरमनने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटर येथे घडली.

रायफलने डोक्यात गोळी घालून एअरमनची आत्महत्या
बेळगांव - एका एअरमनने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटर येथे घडली.
आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नांव अमिरखान रया (वय २४, रा. हरियाणा) असे आहे. सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटरमध्ये नॉन टेक्निकल विभागातील एअरमनना प्रशिक्षण दिले जाते. हरियाणा येथील आमिरखान हा देखील या ठिकाणी प्रशिक्षण घेत होता.
मात्र आज सकाळी त्याने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. तेंव्हा आमिरखान याला उपचारासाठी तातडीने शहरातील इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी आमिरखान याला मृत घोषित केले.
सदर घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण एसीपी तसेच सीपीआय विजयकुमार शिन्नूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेची पोलिसात नोंद झाली असून मयत एअरमन आमिरखान रया याच्या आत्महत्येचे निश्चित कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.