विमानाचा ‘टेक आॅफ’ १५ आॅगस्टपासून
By Admin | Updated: June 29, 2014 01:10 IST2014-06-29T01:04:58+5:302014-06-29T01:10:45+5:30
सुप्रीम एव्हिएशनची तयारी : धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यश; प्रमुख उद्योजकांशी चर्चा

विमानाचा ‘टेक आॅफ’ १५ आॅगस्टपासून
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमान सेवा येत्या पंधरा आॅगस्टपासून सुरू होत आहे. सुप्रीम एव्हिएशन कंपनीतर्फे कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी नियमित विमान सेवा सुरू करण्याची तयारी असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अमित अग्रवाल यांनी आज, शुक्रवारी येथे येऊन सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी ही सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्यासह प्रमुख उद्योजकांसमवेत त्यांची चर्चा झाली. त्यामुळे स्वातंत्र्यदिनापासून विमानाचा ‘टेक आॅफ’ सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले.
विमानसेवा बंद असल्याने पर्यटनासह औद्योगिक विकासालाही अडचणी होत्या. मोठे उद्योग येण्यातही सेवा अडचण बनून गेली होती. या विमानाचा ताबा आता केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी येऊन पाहणी केली, परंतु विमानसेवा सुरू करण्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. आजपर्यंत विमानतळ ‘एमआयडीसी’कडे असताना किमान राज्य शासनाकडे भांडता तरी येत होते आता ते ही करता येत नव्हते. ही कोंडी फोडण्याचे काम खासदार महाडिक यांनी केले. त्यांनी पुढाकार घेऊन सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांशी विमानसेवा सुरू करण्यासंबंधी चर्चा केली. गेल्या आठवड्यात व्यापारी, बांधकाम व्यावसायिक व उद्योजकांसमवेत बैठक घेतली होती.त्यामध्ये त्यांनी विमान सेवा सुरू करण्यास प्रतिसाद दिला होता. त्यानुसार आज कंपनीच्या अध्यक्षांनीच कोल्हापूरला भेट दिली व चर्चेनंतर विमान सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष आकाश अग्रवाल, योगेश कुलकर्णी, भरत ओसवाल, गिरीष रायबागे, रवींद्र तेंडुलकर, अभिजित मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळाचे व्यवस्थापक मनोज हाटे यांनी विमान सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)