तामिळ विद्यापीठाशी पाच वर्षांसाठी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:32 IST2019-04-04T00:32:14+5:302019-04-04T00:32:18+5:30
संदीप आडनाईक । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि तामिळ विद्यापीठासोबत होणाऱ्या या ऐतिहासिक सामंजस्य करारानुसार दोन्ही ...

तामिळ विद्यापीठाशी पाच वर्षांसाठी करार
संदीप आडनाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि तामिळ विद्यापीठासोबत होणाऱ्या या ऐतिहासिक सामंजस्य करारानुसार दोन्ही विद्यापीठे एकमेकांना सहकार्य करणार आहेत. हा करार पाच वर्षांसाठी असून, संबंधिक समितीने यापूर्वीच कागदपत्रे जपणुकीसंदर्भात चार ठिकाणांची निवड केली आहे.
तामिळ विद्यापीठ, तंजावर येथील मोडी हस्तलिखितांचे मराठीकरण करून अतिमहत्त्वाच्या जवळपास साडेसात लाख मोडी हस्तलिखितांचे जतन, संवर्धन करण्यासाठी पूर्वतयारी करून त्याची साफसफाई, कागदपत्रांची विषयवार सूची, ती कागदपत्रे डिजिटायझेशन आणि मराठीकरण करून ते प्रकाशित करणे या कराराचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
करारातील कलमे
१. तंजावर मराठ्यांच्या इतिहासात तसेच संस्कृतीमधील योगदानाबाबत शिवाजी विद्यापीठामध्ये संग्रहालयाच्या माध्यमातून प्रदर्शन भरविणे, यासाठी तामिळ विद्यापीठाचे अधिकारी सहकार्य करतील.
२. दोन्ही प्रांतामधील संस्कृतीच्या कागदपत्रांची देवाण-घेवाण होईल. दोन्ही विद्यापीठांत दोन्ही प्रांतांतील तज्ज्ञ व्याख्यान देतील. तसेच संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतील.
३) हा करार पाच वर्षांसाठी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार पुन्हा पाच वर्षे वाढविण्यात येईल.
४) कुलगुरूआणि प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली दोन्ही विद्यापीठांकडून कराराची अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. यासाठी समन्वयक नेमला जाईल. विद्यापीठांच्या संयुक्त कार्यक्रमांचे तो संचालन करेल.
५) दोन्ही विद्यापीठांत अध्यासनाची स्थापना करण्यात येईल. दोन्ही राज्य सरकारांकडे संबंधित विद्यापीठाचे कुलगुरूया अध्यासनाचे प्रस्ताव पाठवतील.
६) तंजावरमधील दोन प्रांतांच्या संस्कृतीचा अभ्यास करणे, यामध्ये दोन्ही प्रांतामधील मराठा इतिहासाशी संबंधित विशेषत: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भात हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, भाषांतर आणि प्रकाशनाचा समावेश आहे.
७) दख्खनी मराठी भाषेचा विकास तंजावर मराठ्यांमध्ये कसा झाला, या अनुषंगाने अभ्यास करणे.
८) तामिळ, तेलगू आणि इतर दक्षिणी भारतीय भाषेवर मराठीचा कसा प्रभाव पडला, तसेच मोठ्या संख्येने मूळ मराठी शब्दांचा वापर व जपणूक तसेच दख्खनी मराठी भाषेत मोठ्या संख्येने निर्माण झालेल्या मराठी साहित्याचा अभ्यास करणे.