कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचे सुधारणावादी विचार आणि पुरोगामित्वाची परंपरा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडे गावागावांत भोंदूगिरीचे पेव फुटल्याचे दिसत आहे. गंडेदोरे देणारे, भूतबाधा काढणारे आणि करणी केल्याची भीती घालणारे भोंदू बाबा नागरिकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. झटपट यश आणि पैसे मिळविण्याच्या हव्यासातून तरुणाई भोंदूगिरीच्या विळख्यात सापडत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जिल्ह्यात काही गावांमधील स्मशानभूमींत अघोरी पूजा केल्याच्या बातम्या येत आहेत. काही लोकांच्या फोटोंना टाचण्या टोचून, त्यावर हळद-कुंकू टाकून उतारे ठेवले जात आहेत. कुठे झाडांना फोटो लावून त्यांवर खिळे मारले जातात. अंडे-दामटे, लिंबू, काळ्या बाहुल्या यांचे उतारे अमावास्या-पौर्णिमेला तिट्ट्यांवर आणि चौका-चौकांत दिसतात.दोन महिन्यांपूर्वी पंचगंगा नदीघाटावर अघोरी पूजेचा प्रकार घडला. शिरोली पुलाची येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यावरून शिरोली एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी (दि. १२) एका भोंदू बाबाला अटक केली.टिंबर मार्केट येथील चुटकीबाबाच्या व्हिडीओने पुन्हा अंधश्रद्धा बोकाळल्याची वस्तुस्थिती समोर आली. त्यामुळे जिल्ह्याने पुरोगामित्व गुंडाळून अंधश्रद्धांचा आधार घेतला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.भोंदू बाबांचे दरबारशहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी भोंदू बाबांचे दरबार भरतात. शहरात रविवार पेठेत एका भोंदू बाबाचा दरबार आहे. बुधवारी व्हिडीओ व्हायरल झालेल्या चुटकी बाबाचा दरबार नवीन वाशी नाका येथे भरत होता. वाशी आणि कांडगाव येथेही काही भोंदूंचे प्रस्थ वाढले आहे. कांडगाव येथील महाराजांची भेट घेण्यासाठी चार दिवस आधी वेळ घ्यावी लागली, अशी माहिती परिसरातील काही तरुणांनी दिली.अर्थकारणामुळे आकर्षणलग्न जुळत नाही. शिक्षण, नोकरीत अपेक्षित यश मिळत नाही. घरात स्वास्थ्य आणि शांतता नाही. मुलं ऐकत नाहीत. आर्थिक अडचणी... अशा अनेक तक्रारी घेऊन नागरिक भोंदू बाबांकडे जातात. यांतील वाढत्या अर्थकारणामुळे अनेक तरुण भोंदूगिरी करीत आहेत. काही मंदिरांसह मठ त्यांचे अड्डे बनले आहेत. बैलगाडी आणि कुत्र्यांच्या शर्यतींचा शौक बाळगणारी काही टोळकी भोंदू बाबांच्या नादी लागल्याचे दिसत आहे. त्यावर कारवाई होण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Kolhapur, known for progressive values, grapples with rising superstition. Fake healers exploit people, preying on desires for quick success. Aghori rituals and black magic are reported, raising concerns about the region's progressive identity. Young people's attraction to wealth fuels the rise of fraudulent activities.
Web Summary : कोल्हापुर, जो प्रगतिशील मूल्यों के लिए जाना जाता है, बढ़ते अंधविश्वास से जूझ रहा है। धोखेबाज हीलर लोगों का शोषण करते हैं, त्वरित सफलता की इच्छाओं का शिकार होते हैं। अघोरी अनुष्ठानों और काले जादू की खबरें हैं, जिससे क्षेत्र की प्रगतिशील पहचान के बारे में चिंता बढ़ रही है। युवाओं का धन के प्रति आकर्षण धोखाधड़ी वाली गतिविधियों को बढ़ावा दे रहा है।