कोल्हापूर जिल्हा परिषदेत रिक्त जागांवरून आक्रमक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 18:47 IST2017-07-11T18:47:50+5:302017-07-11T18:47:50+5:30
तब्बल पाच तास चालली सर्वसाधारण सभा, ग्रामसेवक, डॉक्टर ‘टार्गेट’

कोल्हापूर जिल्हा परिषदेत रिक्त जागांवरून आक्रमक चर्चा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील रिक्त जागांवरून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आक्रमक चर्चा चालली. तब्बल ५ तास चाललेल्या या सभेत जुन्या सदस्यांबरोबरच नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी आपापल्या भागातील प्रश्न मांडताना आक्रमक भूमिका घेतल्याचे पहिल्याच सभेत दिसून आले. कमी असलेले शिक्षक, नियमितपणे दवाखान्यात नसणारे डॉक्टर आणि वारंवार न भेटणारे ग्रामसेवकांनी सदस्यांनी ‘टार्गेट’केले.
सुरूवातीलाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सर्व विषयांवर चर्चा करू मात्र वाद नको, कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये अशा स्पष्ट सुचना दिल्या. यानंतर श्रध्दांजली, अभिनंदनाचे ठराव झाल्यानंतर विषयपत्रिकेवरील विषय वाचनास सुरूवात झाली. मात्र सदस्य उठून प्रश्न विचारू लागले. तेव्हा प्रत्येक विभागाचे विषय एकत्र वाचन करून त्याला मंजुरी घेण्यात आली. विषयांतर होत असताना अध्यक्षा महाडिक यांनी विषयपत्रिकेवरील विषय मंजूर करण्याची आठवण करून देत आधी हे विषय मंजूर करून घेण्याची भूमिका घेतली.
आरोग्य विभागाच्या आढाव्यावेळी डॉक्टर गावात रहात नसल्याची तक्रार शिवाजी मोरे यांनी केली. तालुक्याची गरज बघून औषधे खरेदी करा असे उमेश आपटे यांनी सांगितले. चंदगड आणि गडहिंग्लजचा मुलींचा जन्मदर वाढला आहे. तेथील उपक्रम जिल्ह्यात राबवण्याची सुचना अॅड. हेमंत कोलेकर यांनी केली. रेबिजची लस उपलब्ध होत नसल्याची तक्रार आजऱ्याच्या सभापती रचना होलम आणि राजवर्धन निंबाळकर यांनी केली. पाटगाव आरोग्य केंद्रात डॉक्टर जात नसल्याचे स्वरूपाराणी जाधव यांनी सांगितले.
दवाखान्यात डॉक्टर उपस्थित हवेत असे डॉ. पदमाराणी पाटील यांनी सांगितले. भगवान पाटील यांनी पदाधिकारी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आमचा ताकतुंबा केल्याचा आरोप केला. राहूल आवाडे यांनी डॉक्टर नेमताना स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी केली. वंदना जाधव, गडहिंग्लजच्या सभापती जयश्री तेली, बजरंग पाटील, सचिन बल्लाळ, हंबीरराव पाटील यांनी आपल्या भागातील प्रश्न मांडले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी २८ कोटी ७६ लाखाचे अंदाजपत्रक मांडून त्याला मंजुरी घेतली. उत्तूर येथील शिक्षणतजज्ञ जे. पी. नाईक वाचनालयासाठी तरतूद करण्याची व उमेश आपटे यांनी सदस्यांना लॅपटॉप देण्याची मागणी केली. अशोक माने यांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. रसिका पाटील यांनी आडूर ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची मागणी केली.
ग्रामसेवकांची नीटपणे हजेरी ठेवण्याची मागणी प्रा.अनिता चौगुले यांनी केली. ग्रामसेवक ग्रामस्थांची दिशाभूल करतात असा आरोप त्यांनी केला. राहूल आवाडे, शाहूवाडीच्या सभापती स्नेहा जाधव, प्रविण यादव यांनी ग्रामसेवक उपस्थित नसल्याच्या तक्रारी केल्या. यावर उमेश आपटे यांनी एकच बायोमेट्रिक मशिन लावून शिक्षक आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना तेथे हजेरी बंधनकारक करावी अशी सुचना मांडली.
जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. जयवंतराव शिंपी यांनी त्या अधिकाऱ्याकडून वेळच्यावेळी अहवाल घेण्याची मागणी केली. सतीश पाटील यांच्या प्रश्नावर बदल्या झालेल्या १४ पशूसंवर्धन डॉक्टरांना सोडणार नसल्याचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील कळेकर यांनी सांगितले.
शाळा दुरूस्तीबाबत नव्या सदस्यांना विश्वासात घेऊन नवा आराखडा करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. स्वाती सासने यांनी उदगावच्या शाळेचा प्रश्न जोरकसपणे मांडला. शाळा आणि शिक्षक या विषयावर जोरदार चर्चा झाली एकाचवेळी अनेक सदस्य उठून बोलू लागले. गटशिक्षणाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख जागा रिक्त आहेत. मुलांनी काय करायचं असे प्रश्न उपस्थित झाले. शिक्षण सभापती अंबरिषसिंह घाटगे यांनी यातून मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले. हंबीरराव पाटील, प्रसाद खोबरे, संध्याराणी बेडगे, कल्लाप्पा भोगण यांनी चर्चेत भाग घेतला. पांडूरंग भांदिगरे यांनी सदस्य, शिक्षकांची सर्व मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घालण्याची मागणी केली. भगवान पाटील यांनी कस्तुरबा गांधी शाळा गगनबावडा येथील गृहप्रमुख ज्योती पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा त्यांच्याबाबत जे काही निर्णय झाले आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांसमोर झाल्याचे सांगितले.
यानंतर शासनाच्या वस्तूंऐवजी थेट अनुदानावरही जोरदार चर्चा झाली. अनेक सदस्यांनी याबाबतच्या अडचणी मांडून पूर्वीप्रमाणे वस्तू मिळाव्यात असा ठराव करण्याची मागणी केली. मात्र तसा ठराव आधी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गोगवेच्या प्राथमिक शाळेला शहीद सावन माने यांचे नाव
माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परूळेकर यांनी गोगवे येथील प्राथमिक शाळेला शहीद सावन माने यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करत शाळेला माने यांचे नाव देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जया गावातील जवान शहीद झाले आहेत तेथील शाळांना त्यांची नावे द्यावीत असा धोरणात्मक निर्णयही यावेळी घेण्यात आला.
निषेधाचा ठराव मांडला आणि बारगळला
भाजपच्या कबनूरच्या सदस्या विजया पाटील यांनी मागील सभागृहातील समाजकल्याण समितीचे सभापती किरण कांबळे यांच्या निषेधाचा ठराव यावेळी मांडला. तीन तीन वर्षे कागदपत्रे पूर्ण करूनही जयांची विविध योजनांसाठी लाभार्थी म्हणून निवड झाली नाही अशांच्यावतीने आपण निषेध ठराव मांडत असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. मात्र माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी काही तरी चुक झाली म्हणून लगेच निषेध करू नका. ठराव मागं घ्यावा अशी विनंती केली. सतीश पाटील यांनीही हा चुकीचा पायंडा पडेल असे सांगितले. यानंतर सभागृहाच्या सन्मानाचा विचार करून ठराव मागे घेत असल्याचे भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी जाहीर केले.
पगारातून वसुली करा
१४ व्या वित्त आयोगातून झालेल्या अनेक कामांचा दर्जा निकृष्ट आहे. सरपंच, ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता यांच्या संगनमताने झालेली अनेक इमारती वर्षभरात पडल्या. यात पैसे खाल्ले गेले. तेव्हा अशा कामांची चौकशी करून त्यांच्या पगारातून वसुली करा अशी मागणी विजय भोजे यांनी केली.