आता कार्यालयाबाहेर एजंटगिरी

By Admin | Updated: July 17, 2014 00:08 IST2014-07-17T00:08:44+5:302014-07-17T00:08:44+5:30

हातकणंगले तहसील कार्यालयातील सरकारी बाबंूवर कारवाईची मागणी

Agentura now out of the office | आता कार्यालयाबाहेर एजंटगिरी

आता कार्यालयाबाहेर एजंटगिरी

हातकणंगले : तालुक्यातील ६२ गावांतील तहसील कार्यालयाकडे कामासाठी येणाऱ्या विद्यार्थी-नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी तसेच तहसील कार्यालयाच्या कामामध्ये एजंटगिरी करणाऱ्यांनाही चाप बसावा याकरिता तहसील कार्यालयाच्या प्रत्येक विभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तहसीलदार दीपक शिंदे यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. याचे नागरिकांनी स्वागत केले.
मात्र, काही सरकारी बाबू आजही आपल्या कामाचा निपटारा कार्यालयाबाहेर करत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा सरकारी बाबूंवर कारवाई व्हावी, अशी मागणी आहे.
तहसीलदार दीपक शिंदे यांनी आपल्या कामकाजाची सुरुवात प्रशासनाला शिस्त लावण्यापासून सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले यांबरोबरच जमीन महसूल, शासकीय रॉयल्टी, बिगर शेती जमीन, करमणूक आणि रेशनकार्ड या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात एजंटांची कमाई सुरू होती. कोणतेही काम एजंटाशिवाय होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. वृद्धापकाळ योजनेची पेन्शन, संजय गांधी निराधाराचे अनुदान यामध्येही एजंटांचा धुमाकूळ सुरू होता. या संपूर्ण एजंटगिरीवर लक्ष ठेवून तहसीलदार दीपक शिंदे यांनी प्रत्येक विभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. या स्तुत्य कारभारामुळे नागरिकांनी त्यांच्या कामाचे स्वागत केले. (वार्ताहर)
तहसीलदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी तहसीलदारांच्या गैरहजेरीत काम घेऊन येणाऱ्या लोकांना कार्यालयाच्या बाहेरील टपऱ्या, हॉटेल यांच्या आश्रयाला बोलावून आपले सरकारी काम फत्ते करीत आहेत. एजंटांना कार्यालय बंदी असली, तरी सरकारी बाबू आपले काम कार्यालयाबाहेर करीत आहेत.

Web Title: Agentura now out of the office