राजकीय पाठबळाने एजंट गब्बर, त्यातूनच बोगस कामगारांचे जाळे..; कोट्यवधी रुपयांची लूट
By उद्धव गोडसे | Updated: July 31, 2025 17:15 IST2025-07-31T17:12:33+5:302025-07-31T17:15:10+5:30
सहायक कामगार आयुक्तांकडून सुरू झालेल्या तपासणीमुळे अनेकांचे बिंग फुटणार

राजकीय पाठबळाने एजंट गब्बर, त्यातूनच बोगस कामगारांचे जाळे..; कोट्यवधी रुपयांची लूट
उद्धव गोडसे
कोल्हापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. याचा लाभ उठविण्यासाठी गावागावांत एजंट सक्रिय झाले आहेत. त्यांनी बनावट दाखले तयार करून बोगस कामगारांची फौजच कागदोपत्री तयार केली आहे. मंडळाच्या योजनांचा लाभ घेणारे आणि बोगस कामगारांकडून कमिशन उकळणारे एजंट गब्बर झाले आहेत. राजकीय पाठबळामुळे त्यांचे फावले होते. मात्र, आता सहायक कामगार आयुक्तांकडून सुरू झालेल्या तपासणीमुळे अनेकांचे बिंग फुटणार आहे.
गेल्या १०-१२ वर्षांत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला कोट्यवधी रुपयांचा मिळाला. या पैशातून बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांना सुरक्षा साहित्याचा संच देणे, ७५ टक्के दिव्यांग कामगारांना दोन लाखांची आर्थिक मदत करणे, कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत वैद्यकीय उपचार करणे, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक साहाय्य, संसारोपयोगी भांडी, घरकुल, काम करताना किंवा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते.
वाचा- बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी, ४५ लाखांचा गंडा; कोल्हापुरात २५ जणांवर गुन्हा
अशा विविध योजनांचा लाभ उठविण्यासाठी काही एजंटनी बोगस कामगारांच्या नोंदी सहायक कामगार आयुक्त कार्यालयांकडे केल्या आहेत. बांधकाम क्षेत्राशी काही संबंध नसलेल्या हजारो नावांची नोंदणी केली. त्यांच्या नावावर एजंट लाभ उठवत आहेत. राजकीय पाठबळामुळे राज्यात सर्वत्र हीच स्थिती असल्याने मंडळाच्या कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे.
पडताळणीच नाही
कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांची वेळोवेळी पडताळणी करणे गरजेचे होते. मात्र, कोणतीही खातरजमा न करता नोंदणी झाली आणि लाभाचे वाटपही झाले. तक्रारींचा ओघ वाढताच सहायक कामगार आयुक्तांकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांत तपासणी सुरू झाली आहे. यातून बोगस बांधकाम कामगारांसह एजंटच्या साखळीचा पर्दाफाश होणार आहे. त्यामुळे एजंटगिरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बनावट दाखल्यांचे रॅकेट
मोठे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी बनावट दाखले तयार करून देणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून मृत्यू दाखले, दिव्यांग दाखले, शैक्षणिक कागदपत्रे तयार करून दिली जात आहेत. मुलीच्या लग्नासाठी मिळणारी मदत लाटण्यासाठी लग्न झाल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. असे अनेक गंभीर प्रकार राज्यात सर्वत्र सुरू आहेत.