पुन्हा दगडी पिठाचा वापर
By Admin | Updated: January 17, 2015 00:07 IST2015-01-16T23:57:49+5:302015-01-17T00:07:44+5:30
आदेशाला हरताळ : सासने मैदानाजवळच्या रस्त्यावरील प्रकार

पुन्हा दगडी पिठाचा वापर
कोल्हापूर : शहरात नव्याने सुरू असलेल्या रस्तेबांधणीचे काम दर्जेदार पद्धतीनेच झाले पाहिजे, यासाठी कनिष्ठ व सहायक अभियंत्यांनी रस्त्यांची दररोज पाहणी करावी. दगडी पिठाचा वापर टाळून योग्य प्रमाणात डांबरमिश्रित खडीच रस्त्यासाठी वापरली पाहिजे. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल, असा सक्त आदेश अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी दिला आहे; पण या आदेशाला ताराराणी विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांनी आज, शुक्रवारी केराची टोपली दाखविली. सासने मैदानाजवळील रस्त्यावर अल्प प्रमाणात डांबर वापरून सुरू असलेल्या रस्त्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करीत ताराराणी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केल्यानंतर यंत्रणेला जाग आली.
शहरात १०८ कोटींचे नगरोत्थान योजना, तसेच विशेष निधीतून तब्बल १५० हून अधिक रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील एकही रस्ता वर्षापेक्षा अधिक काळ टिकत नाही, हे लक्षात आल्यानंतर आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी रस्त्याच्या कामांची जबाबदारी निश्चित केली. सुरुवातीच्या काळात अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व विभागीय कार्यालयातील अभियंत्यांनी रस्त्याच्या कामांवर लक्ष ठेवण्याचा जुजबी प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्षात ही कामे सुरू होताच अधिकाऱ्यांची ही फौज गायब झाली. अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताच ठेकेदारांची आता मनमानी सुरू आहे. रस्त्यांसाठी योग्य प्रमाणात खडी व डांबर वापरले जात नाही. तरी महापालिकेचे कनिष्ठ अभियंते याकडे पूर्णत: दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सगळेच आलबेल
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या कारणास्तव परिसरातील नागरिकांनी ताराराणी विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली. यानंतर कामाची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना काम सुरू असल्याचे समजले. ‘अरेच्या! काम सुरू आहे का... पाहतो काय झाले ते...’ असे म्हणत कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी सासने मैदानाकडे धाव घेतली. अधिकारी प्रत्यक्ष पोहोचेपर्यंत ठेकेदाराने दिवसभरातील काम फत्ते केले होते.