टीम इंडियाचा पाकिस्तानवर सहज विजय, कोल्हापुरात शिवाजी चौकात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी
By संदीप आडनाईक | Updated: September 15, 2025 00:45 IST2025-09-15T00:42:46+5:302025-09-15T00:45:08+5:30
भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज एकतर्फी विजय मिळवताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी तरुण क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला.

टीम इंडियाचा पाकिस्तानवर सहज विजय, कोल्हापुरात शिवाजी चौकात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी
संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज एकतर्फी विजय मिळवताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी तरुण क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला.
पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना झाला. विजयाची चाहूल लागताच अनेक तरुणांनी अकरा वाजताच आपला मोर्चा चौकाकडे वळवला. तिरंगा आणि भगव्या झेंड्यांसह गर्दी वाढू लागली. स्पीकरवर विजयी गीत वाजवत अनेकजण चौकात थिरकू लागले.दुचाकीच्या पुंगळ्या काढून तरुणांचा लोंढा शहरातून फिरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमला. विजयावर शिक्कामोर्तब होताच एकच जल्लोष आणि आतषबाजी करण्यात आली. जय श्रीराम, वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत क्रिकेटप्रेमींनी सुमारे तासभर जल्लोष केला. लहान मुलांना खांद्यावर घेऊन अनेकजण नाचत होते. मोबाईल कॅमेऱ्यावर अनेकजण व्हिडिओ, रिल्स करत होते. अनेकजण सेल्फी काढत होते. महिला, मुले आणि तरुण बेभानपणे नाचत होते.
पोलीसांकडून गस्त, तगडा बंदोबस्त
अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शहरातील धार्मिक स्थळे,रस्त्यावर पोलीसांनी चोख बंदोबस्त नेमला होता. वरिष्ठ अधिकारी आपल्या हद्दीवर लक्ष ठेवून होते. जिल्ह्यत कुठेही अनुचित प्रकार घडू नये अथवा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही असे कृत्य घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून होते. शीघ्र कृती दलाचे दोन प्लॅटून बंदोबस्तासाठी तैनात होते. बाराच्या ठोक्याला रात्री चौकात जमलेल्या तरुणांना घरी जाण्याचे आवाहन करत पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला. नंतर शहरातून गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.