प्रशासक नियुक्तीनंतरच महामंडळाचे ग्रहण सुटेल
By Admin | Updated: March 17, 2016 00:05 IST2016-03-17T00:05:05+5:302016-03-17T00:05:16+5:30
याचाच परिणाम मागील सर्वसाधारण सभेत ‘रोख रक्कम माझ्याकडे आहे आणि ती एका विशिष्ट कामासाठी ‘अंडर टेबल’ देण्याकरिता मी स्वत:जवळ ठेवली आहे’ असे

प्रशासक नियुक्तीनंतरच महामंडळाचे ग्रहण सुटेल
विद्यमान कार्यकारिणीतील संचालक, विशेषत: तत्कालीन अध्यक्ष यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत केलेला मनमानी कारभार, चॅरिटी कमिशनच्या परवानगीशिवाय मोडलेल्या मुदतबंद ठेवी, मानाचा मुजरा कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी त्यावेळी केलेली पैशांची वारेमाप उधळपट्टी, अशा अनेकविध कारणांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून महामंडळाचा कार्यकाळ वादग्रस्त आणि अंधारमय झाला.
याचाच परिणाम मागील सर्वसाधारण सभेत ‘रोख रक्कम माझ्याकडे आहे आणि ती एका विशिष्ट कामासाठी ‘अंडर टेबल’ देण्याकरिता मी स्वत:जवळ ठेवली आहे’ असे जाहीरपणे विधान करून महामंडळाच्या पारदर्शी कारकिर्दीला चारित्र्यहननाचा काळाकुट्ट डाग लागला. त्याच सभेत त्यांनी रक्कम उपाध्यक्षांच्या स्वाधीन करीत असल्याचे कबूल केले आणि उपाध्यक्षांनीही, ती उद्या बँकेत भरत असल्याच सांगितले. पण, ती रक्कम त्यांनी भरली नाही, हे महामंडळाने न्यायालयात तत्कालीन अध्यक्ष, सहखजिनदार यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फिर्यादीने सिद्ध होते. अर्थातच सभेत आणलेल्या रोख रकमेचे गौडबंगाल काय आहे? उपाध्यक्षांवर महामंडळाने का कारवाई केली नाही, हे त्याहूनही भयानक आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करण्याबरोबरच, महामंडळाचे कार्य पारदर्शी चालवण्याची प्रमुख कार्यवाह म्हणून आणि स्वत:ला महामंडळाच्या संस्थापकांपैकी एक समजणारे (?) सुभाष भुरके यान्ाांही तितकेच जबाबदार धरून, त्यांच्यावरही कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. म्हणजे भविष्यात असे दु:साहस करण्याचा विचारही कोणी करणार नाही. कामगार-तंत्रज्ञ-कलाकारांच्या घामाचा आणि निर्मात्यांच्या कष्टाचा विचार करून, माजी अध्यक्ष आणि संबंधितांनी महामंडळाच्या पैशांची केलेली उधळपट्टी, सत्तेचा गैरवापर, मनमानी कारभार, हुकूमशाहीने घेतलेले निर्णय, अशा अनेक बाबी ध्यानात घेऊन सर्व संबंधित दोषींची प्रशासकामार्फत चौकशी करावी. हे घडणे आणि घडविणे महामंडळाच्या उज्ज्वल भविष्याकरिता आवश्यक आहे. गोचडीच्या रूपाने महामंडळाला चिकटलेला राजकीय स्पर्श सर्वशक्तीनिशी सर्वांनीच काढून फेकून देणे आणि संकटांच्या कडेलोटावर असलेली महामंडळ ही संस्था वाचविणे एवढीच महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी पूर्वसंध्येला सर्व सभासद-हितचिंतकाकडून रास्त अपेक्षा!
गेल्या पाच वर्षांतील तिसऱ्या अध्यक्षांनी काय दिवे लावले, हे प्रशासकीय चौकशीशिवाय बाहेर पडणे अशक्य आहे. महामंडळाचे कोल्हापुरातील प्रमुख व्यवस्थापक आणि मुंबईतील शाखा व्यवस्थापक यांनी मात्र मिळेल तेवढा हात धुऊन घेतला. फेरलेखापरीक्षणात त्यांच्या पापकृत्याचा आलेख दिसून येतो. जे नजरेला आले, कळले, वाचले, त्याचा हा लेखाजोखा. मग पडद्यामागे काय काय घडले असेल ही कल्पनाही करवत नाही. गेल्या पाच वर्षांतील आर्थिक घोटाळ््यांची मालिका सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट व्हायची असेल तर होऊ घातलेल्या निवडणुकांऐवजी महामंडळाचे सर्वंकष शुद्धिकरण होण्यासाठी प्रशासकाची अत्यंत गरज आहे. तसे घडले तरच महामंडळाचे काळेकुट्ट ग्रहण सुटेल.
समाप्त