समस्त मावळ्यांना अभिमान वाटेल! १७५ वर्षानंतर रांगण्यावरील त्या तोफा होणार तोफगाड्यावर विराजमान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 14:32 IST2022-03-17T14:32:11+5:302022-03-17T14:32:27+5:30
बोरवडे-बिद्रीच्या त्रिवेणी रांगणा मावळ्यांनी ३ लाख रुपये स्वखर्चातून तयार केले १२०० किलो वजनाचे दोन तोफगाडे; २६ मार्चला जिल्हाधिका-यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा!

समस्त मावळ्यांना अभिमान वाटेल! १७५ वर्षानंतर रांगण्यावरील त्या तोफा होणार तोफगाड्यावर विराजमान!
- रमेश वारके
बोरवडे : कागल तालुक्यातील बोरवडे-बिद्रीच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या मावळ्यांनी तीन हजार फूट खोल दरीत ढकललेल्या दोन तोफा गडावर आणल्या होत्या.या तोफेंच्या संरक्षणासाठी त्रिवेणी रांगणा मावळ्यांनी आणि मोहिमेचे प्रमुख महादेव फराकटे यांनी स्वखर्चातून तीन लाख रुपये खर्च करुन १२०० किलो वजनाचे दोन तोफगाडे तयार केले आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी राहूल रेखावार , आमदार प्रकाश आबिटकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२६ मार्च रोजी होणार आहे.
रांगणा किल्याच्या खोल दरीत इंग्रजांनी गडावरील तोफा ढकलून दिल्या होत्या. अथक परिश्रम घेवून महादेव फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली कांही महिन्यापूर्वी अडीच टन वजनाच्या व नऊ फूट लांबीच्या दोन तोफा चेनब्लाॕकच्या सहाय्याने या मावळ्यांनी गडावर सुरक्षित आणल्या. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाची या तोफांना संरक्षणाच्या व सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून परवानगी मिळाल्यानंतर त्रिवेणी रांगणा मावळ्यांनी स्वखर्चातून गडावर चौथरा बांधला व चार महिन्याच्या कालावधीत तोफेसाठी तोफगाडे तयार केले. या तोफगाड्यांचे पूजन बिद्री येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , खासदार संजय मंडलिक , शिवभक्त हर्षल सुर्वे यांच्या हस्ते १९ मार्च रोजी होणार आहे.
"रांगण्यावरील तोफा गडावर आणून आणि स्वखर्चातून तोफगाडे तयार करुन त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या शिलेदार मावळ्यांनी आजच्या तरुणा समोर आदर्श निर्माण केला आहे.अजूनही गडावरील खोल दरीत ऊर्वरीत तोफांचा शोध घेवून त्या गडावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत यासाठी स्थानिक लोकांनी व इतिहास प्रेमींनी सहकार्य करावे." महादेव फराकटे (बोरवडे,शोध मोहिम प्रमुख )
"या मावळ्यांनी दिला भरकटलेल्या युवा पिढीसमोर आदर्श" - सुनिल वारके , प्रविण पाटील, नेताजी साठे , निखिल परीट, चंद्रकांत वारके,बाजीराव खापरे,जीवन फराकटे , शरद फराकटे , राहूल मगदूम , भाऊ साठे, तानाजी साठे, गणेश साठे,बजरंग मांडवकर ,रघुनाथ वारके, अरुण मगदूम.