धामोड आरोग्य केंद्राचा पंचनामा -सोयी-सुविधांबाबत प्रशासन धारेवर :
By Admin | Updated: July 30, 2014 00:30 IST2014-07-29T23:41:29+5:302014-07-30T00:30:53+5:30
विजय सूर्यवंशी यांच्याकडून अचानक पाहणी

धामोड आरोग्य केंद्राचा पंचनामा -सोयी-सुविधांबाबत प्रशासन धारेवर :
धामोड : धामोड (ता. राधानगरी) येथील आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आज, मंगळवारी सुटी असतानाही अचानक भेट देऊन तेथील कामकाजाचा पंचनामा केला. आरोग्य केंद्रातील सोयी-सुविधांबाबत त्यांनी प्रशासनास धारेवर धरत चांगली सेवा देण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या या भेटीमुळे कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ आणि भंबेरी उडाली.
आज, मंगळवारी रमजान ईदची शासकीय सुटी असतानादेखील डॉ. विजय सूर्यवंशी यांनी धामोड प्राथमिक आरोग्य केंद्राला दुपारी तीन वाजता भेट दिली. येथील दोनही वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याचे आढळले, तर डॉ. सूर्यवंशी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना कर्तव्य व जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत आरोग्य केंद्रातील औषध विभाग, आॅपरेशन थिएटर, पुरुष जनरल वॉर्ड, महिला वॉर्ड, जनरेटर रूम व स्वच्छतागृहाची माहिती घेत प्रत्यक्ष भेटी दिल्या. या वॉर्डमधील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्त्री वॉर्डमधील महिलांकडे या आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेबाबत चर्चा केली.
‘लोकमत’शी बोलताना त्यांनी या आरोग्य केंद्रातील काही चुकीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत, यामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. आरोग्य केंद्र लोकांसाठी आधारवड आहे. रुग्णांना योग्य उपचार देणे कर्तव्य असून, त्यात कोणी कसूर केली तर गय करणार नाही. त्यासंदर्भातला अहवाल तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागवला आहे; पण त्याचबरोबर या आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत स्वत: पुढाकार घेऊन विशेष लक्ष देऊन आरोग्य केंद्राची ढासळलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्य केंद्रातील विद्युत पुरवठ्यासाठी ताबडतोब जनरेटरची व्यवस्था करण्याची ग्वाही त्यांनी दिली. (वार्ताहर)
सुटीदिवशीही पाहणी
मंगळवारी रमजान ईदची शासकीय सुटी असतानादेखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘सरकारी’ रुग्णालयाला भेट देऊन, प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत माहिती घेतल्याबाबत ग्रामस्थांतून व रुग्णांतून कौतुक झाले.