इंदुमती गणेशकोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेली अक्षयतृतीया अल्पवयीन मुलींच्या बालपणाच्या मुळावर उठण्याची भीती महिला बालविकास विभागासह बालविवाहाविरोधात काम करणाऱ्या संस्थांना आहे. यादिवशी दुर्गम तसेच सीमावर्तीय भागात मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता असल्याने गाव व तालुका पातळीवर बालसंरक्षण समित्यांना अलर्ट राहण्याची सूचना देण्यात आली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात बालविवाहाची ३८ प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी २८ विवाह रोखण्यात यश आले आहे.कोल्हापूरसारख्या पुरोगामी व समृद्ध जिल्ह्यातदेखील विशेषत: दुर्गम भागात व कर्नाटक सीमाभागाजवळील गावांमध्ये संख्या अधिक आहे. बालविवाह रोखण्यासाठी ग्राम बालसंरक्षण समिती, बालकल्याण समिती, चाइल्डलाइन तसेच तालुकास्तरावर व जिल्हास्तरावरदेखील विविध समित्या कार्यरत आहेत. मात्र, आपल्याच गावचे आहेत, नातेवाईक आहेत, वाकड्यात कोण शिरणार, या विचाराने अनेकजण गप्प बसतात. त्रयस्थांकडून माहिती मिळाली तर बालविवाह रोखता येतो; पण घरातल्या घरातच विवाह करून मोकळे झाले की काही कळत नाही.
अक्षयतृतीयेवर वॉचउन्हाळ्यात तसेच अक्षयतृतीयेसारख्या दिवशी वेगळा मुहूर्त पाहावा लागत नाही. त्यामुळेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत त्यांनी यंत्रणांना अलर्ट राहायला सांगितले आहे. तसेच ग्रामसेवक, पोलिस पाटील, स्वयंसेवकांच्या टीमला धाडी टाकण्यास सांगितल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली.
२८ बालविवाह रोखण्यात यशजिल्ह्यातील ३८ प्रकरणांपैकी २८ प्रकरणांतील बालविवाह रोखण्यात जिमाबा, स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्थांना यश आले आहे. मात्र, १० प्रकरणांत बालविवाह झाले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बालविवाहाचे सर्वाधिक प्रमाण असलेले जिल्हे
- परभणी : ४८ टक्के
- बीड : ४३.७ टक्के
- धुळे : ४०.५ टक्के
- सोलापूर : ४०.३ टक्के
- हिंगोली : ३७.१ टक्के
(याशिवाय नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे.)
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात बालविवाहाचे प्रमाण कमी असले तरी कर्नाटक सीमेवर हे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सीमाभागात बालविवाहाची शक्यता असल्याने धर्मगुरूंच्या माध्यमातून बालविवाहाविरोधात जनजागृती सुरू आहे. - रविना माने, सामाजिक कार्यकर्त्या, जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन