अहवाल न देणाऱ्या संस्थांवर कारवाई
By Admin | Updated: February 14, 2017 23:53 IST2017-02-14T23:53:59+5:302017-02-14T23:53:59+5:30
दोष-दुरुस्ती : आढावा बैठकीत बाळासाहेब यादव यांचा इशारा; ५१६० संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण

अहवाल न देणाऱ्या संस्थांवर कारवाई
कोल्हापूर : लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटींचा दुरुस्ती अहवाल वेळेत सादर न करणाऱ्या संस्थांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव यांनी दिला. जिल्ह्यातील प्रमाणित लेखापरीक्षक व सनदी लेखापालांची मंगळवारी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये सन २०१५-१६ या कालावधीतील लेखापरीक्षण, दोष-दुरुस्ती अहवाल व सन २०१६-१७ कालावधीतील लेखापरीक्षणा- बाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्यासह साडेचारशे लेखापरीक्षक उपस्थित होते. सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणानंतर दुग्धवगळता ६०२८ संस्था अस्तित्वात असून, सन २०१५-१६ या कालावधीतील ५१६३ संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित संस्थांचे लेखापरीक्षण का राहिले, याबाबतची माहिती बाळासाहेब यादव व अरुण काकडे यांनी घेतली. ठराव मागवून नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांचे बऱ्यापैकी काम पूर्ण झाले असून आदेश काढलेल्या संस्थांचे काम थोडे मागे राहिल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. केवळ लेखापरीक्षण पूर्ण होऊन चालणार नाही, तर त्यातील निघालेल्या दोषांची दुरूस्ती अहवाल तत्काळ सादर करण्याची सूचनाही दिली. कायद्याने तीन महिन्यांच्या आत हा अहवाल देणे बंधनकारक आहे. आठ दिवसांत जे अहवाल देणार नाही, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशारा यादव यांनी दिला. आगामी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ६०७८ संस्थांचे लेखापरीक्षण करावे लागणार आहे. त्यापैकी ५३०९ संस्थांचे ठराव तर ४७६ संस्थांचे लेखापरीक्षणाबाबत आदेश काढले आहेत. या कालावधीतील लेखापरीक्षण जुलै २०१७ पर्यंत १०० टक्के करण्याची सूचनाही बाळासाहेब यादव यांनी दिली.
गैरव्यवहार : संबधितांवर फौजदारीएप्रिल २०१६ पर्यंत लेखापरीक्षणात सात संस्थांत ५ कोटी १० लाखांचा गैरव्यवहार आढळला होता.
याबाबत संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
या सातपैकी पाच गैरव्यवहार सनदी लेखापालांनी तर दोन प्रमाणित लेखापरीक्षकांनी उघडकीस आणले.
याबद्दल प्रमाणित लेखापरीक्षक तेली व श्रीकांत चौगले
यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.