अभिषेक, ननवरे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 16:14 IST2020-02-06T16:11:19+5:302020-02-06T16:14:04+5:30
उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठाचा ५६ व्या दीक्षान्त समारंभात पार पडला. त्यामध्ये यंदा सर्वाधिक ६० हजार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते.

अभिषेक, ननवरे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव
कोल्हापूर :उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठाचा ५६ व्या दीक्षान्त समारंभात पार पडला. त्यामध्ये यंदा सर्वाधिक ६० हजार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते.
त्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीच्या सन २०१९-२०२० चे राष्ट्रपती सुवर्णपदक कोल्हापूरच्या अभिषेक दादासाहेब श्रीराम याला आणि एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल कुलपती पदक हे सातारा येथील कीर्ती दत्तात्रय ननवरे हिला प्रदान करण्यात आले.
तथाकथित विकासाच्या गदारोळात मोठ्या मोठ्या शहरांनी आपली ओळख हरविली आहे. मात्र, कोल्हापूरकरांनी आपल्या शहराची ओळख कायम राखली आहे. खरा भारत हा खेड्या आणि कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये वसला आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी गुरूवारी येथे केले. विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
डॉ. पटवर्धन म्हणाले, मॅकॉलिझमची ‘कुलगुरू’ नव्हे, तर गुरूकुल व्यवस्थेकडे पुन्हा जाण्याची, सध्याच्या शैक्षणिक प्रणालीच्या पुर्नविचाराची आवश्यकता आहे. महात्मा गांधी यांच्या ‘बुनियादी शिक्षण’ प्रणाली घेऊन भविष्यातील शिक्षण दिले पाहिजे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आई, मातृभाषा, भारतमाता आणि प्रकृतीमाता (पर्यावरण) यांचा प्रत्येकाने आदर राखावा. विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी जिद्द, कष्टाने कार्यरत रहावे.
प्रारंभी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे, अर्थतज्ञ जे. एफ. पाटील, बी. पी. साबळे, डॉ. शर्मा, आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. तृप्ती करेकट्टी, नंदिनी पाटील, सुस्मिता खुराळे, श्रद्धा निर्मळे, धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.