आजऱ्यातील वनौषधी पार्कला अवकळा
By Admin | Updated: December 4, 2014 23:34 IST2014-12-04T22:17:59+5:302014-12-04T23:34:59+5:30
६५ लाखांचा चुराडा : देखरेखीसाठी कामगार वर्गच नसल्याने वर्षभरातच दुरवस्था

आजऱ्यातील वनौषधी पार्कला अवकळा
ज्योतिप्रसाद सावंत - आजरा --महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पणन विभागातर्फे आजरा येथे सुमारे १८ एकर क्षेत्रांवर ६५ लाख रुपये खर्च करून उभा करण्यात आलेल्या औषधी, सुगंधी वनस्पती व जैवविविधता पार्कला उद्घाटनानंतर वर्षभरातच अवकळा आली असून, देखरेखीसाठी कामगार वर्गच नसल्याने या पार्कची दुरवस्था झाली आहे.
३० डिसेंबर २०१३ रोजी तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या पार्कमध्ये पुढील सेवा सुविधा पुरवण्याकरिता ५० लाख रुपयांचा निधीही मंत्री पाटील यांनी जाहीर केला होता. ८० लाख लिटर पाणी स्त्रोत असणारे आलिशान तळे येथे बांधण्यात आले आहे. सामूहिक शेततळे, रोप लागवड, नक्षन वन, चाफा वन, वनौषधी संग्रहालय, सुगंधी गवत लागवड, तेलताड लागवड, गुरे प्रतिबंधक चर, काजू प्रक्षेत्र, नैसर्गिक वायू, अशा बऱ्याच बाबींचा या पार्कमध्ये समावेश होता.
वनौषधी पार्कच्या देखरेखीची जबाबदारी येथील कृषी विभागाच्या बीज गुणन केंद्रावर सोपविण्यात आली. मुळातच बीज गुणन केंद्राकडे अपुरा कर्मचारी वर्ग व त्यातच या वनौषधी पार्कची जबाबदारी, अशी विचित्र अवस्था या विभागाची झाली. सद्य:स्थितीत १८ एकर क्षेत्राच्या साफसफाई, पाणी घालणे, गवत काढणे, आदी कामांसाठी एकमेव कर्मचारी ठेवण्यात आला आहे. या कर्मचाऱ्याकडून वर्षभरात या क्षेत्रातले गवत काढणेही अशक्य आहे. इतर कामांचा प्रश्न वेगळाच. आता हळूहळू या पार्कची अवस्था विचित्र होऊ लागली आहे. पार्कमध्ये सर्वत्र गवताचे साम्राज्य आहे. वनौषधी वनस्पती गवतामधून दिसेनाशी झाल्या आहेत. तळ्याशेजारील देखरेख इमारतीचा दरवाजा तुटला आहे. नक्षत्रांचे अराध्य वृक्ष गायब झाले आहेत. दुर्मीळ अशा वनस्पती खऱ्या अर्थाने दुर्मीळ झाल्या आहेत. तेलताडीचा पत्ता नाही. स्वच्छता नाही, असाच हा प्रकार आहे.
मंत्री आले... दणक्यात उद्घाटन झाले... आश्वासनांची खैरात झाली; परंतु, प्रत्यक्षात वनौषधी पार्कच्या नशिबात उद्घाटनानंतर वर्षभरातच अवकळा आली.
पुढे चर्चाच नाही : संभाजी पाटील
या वनौषधी पार्कच्या देखरेखीची जबाबदारी येथील तालुका शेतकरी मंडळाकडे सोपविण्याची चर्चा झाली; पण पुढे अचानक चर्चा थांबल्याने इच्छा असूनही आपण काहीच करू शकत नाही, असे मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी स्पष्ट केले.
अधिकारी बदलले, दृष्टी बदलली
तत्कालीन जिल्हा
कृषी अधीक्षक उमेश पाटील यांच्या प्रयत्नातून या वनौषधी पार्कची उभारणी करण्यात आली.
परंतु, त्यांच्यानंतर मात्र या पार्कला कोणीच गांभीर्याने न घेतल्याने पार्कची दुरवस्था
झाली आहे.