कोल्हापूर : राजारामपुरी येथील आगमन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाला. बुधवारी (दि. २७) रात्री सव्वाआठच्या सुमारास चौथ्या गल्लीत झालेल्या घटनेत वाजिद जमादार (रा. सायबर चौक, कोल्हापूर) हा जखमी झाला असून, त्याच्यावर राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.राजारामपुरीतील आगमन मिरवणूक सुरू असताना चौथ्या गल्लीत काही तरुण मुख्य मार्गाकडे निघाले होते. त्यावेळी वाजिद जमादार हा तरुण विरुद्ध दिशेला निघाला होता. जुन्या ओळखीचे असल्याने तरुणांनी जमादार याचा हात पकडून त्याला नाचण्याचा आग्रह केला. यातून दोघांमध्ये वाद झाला. काही वेळात जमादार याच्यावर एकाने चाकूने हल्ला केला. तरुणांनी हल्लेखोरास पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी जखमी जमादार याला जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना बंदोबस्तावरील पोलिसांना दिल्या. तसेच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना हल्लेखोरास पकडण्यासाठी पथक रवाना करण्याचा आदेश दिला. मिरवणुकीत झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.घटना सीसीटीव्हीत कैदचाकूहल्ल्याची घटना जवळच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यावरून हल्लेखोराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी आणि हल्लेखोर दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नाचण्याच्या वादातून हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
Kolhapur: मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:14 IST