कोल्हापूर : शिवाजी पेठेतील संध्यामठ परिसरात प्रशांत भीमराव कुंभार (वय ३२, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) या तरुणाचा आर्थिक वादातून चाकूने भोसकून खून झाला. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला. काही तरुणांनी गंभीर जखमी अवस्थेतील प्रशांत याला एकच्या सुमारास सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कुंभार हा कॉम्प्युटर आणि प्रिंटर दुरुस्तीचे काम करीत होता. पैशांच्या देवाणघेवाणीतून नरेंद्र साळोखे याच्याशी दोन वर्षांपासून त्याचा वाद सुरू होता. साळुंखे याने वाद मिटवण्यासाठी त्याला बुधवारी रात्री संध्यामठ परिसरात बोलवून घेतले होते. मात्र, चर्चेतून वाद वाढत गेला. यातूनच साळोखे याने प्रशांत कुंभार यांच्या पाठीत आणि पोटात चाकूने वार केले. पाठीत असलेला चाकू तसाच सोडून साळोखे निघून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कुंभार हा गंभीर अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच त्याचे काही मित्र घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने त्याला खासगी वाहनातून सीपीआरमध्ये पोहोचवले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
पोलिसांकडून संशयीताचा शोध सुरूघटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी. नरेंद्र साळोखे या संशयिताने चाकूने भोसकून खून केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.