कोल्हापूर : मित्राला मोबाइलवर लोकेशन पाठवून साहील साताप्पा जाधव (वय १९, सध्या रा. खडकेवाडा, ता. कागल, मूळ रा. वाघापूर, ता. भुदरगड) याने कळंबा परिसरात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी (दि. १) सकाळी निदर्शनास आला. साहील हा गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करीत होता. उमद्या मुलाने आत्महत्या केल्याने जाधव कुटुंबीयांना धक्का बसला.करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील जाधव हा आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून नुकताच गोकुळ शिरगाव येथील एका कंपनीत नोकरी करीत होता. वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. आई आणि लहान भावासह तो खडकेवाडा येथे राहत होता. रविवारी सकाळी तो मित्राच्या दुचाकीवरून कामाला निघाला होता. मात्र, कळंबा येथे तो दुचाकीवरून उतरला. थोड्या वेळाने येतो, असे सांगून त्याने मित्राला पुढे पाठवले.वाघापूर येथील एका मित्राच्या मोबाइलवर स्वत:चे लोकेशन पाठवून तो उसाच्या शेतातून एका आंब्याच्या झाडाजवळ गेला. दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी न आल्याने नातेवाईक आणि मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. रविवारी रात्री उशिरा मित्राच्या मोबाइल लोकेशनवरून त्याचा शोध लागला.नातेवाइकांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. इतर नातेवाईक वाघापूर येथे असतात. अचानक घडलेल्या घटनेने नातेवाइकांना धक्का बसला असून, पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
Kolhapur: मित्राला लोकेशन पाठवून तरुणाने गळफास घेत संपविले जीवन, कुटुंबीयांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:22 IST