धक्कादायक! घरच्या बांधकामावर पाणी मारताना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 20:25 IST2023-04-20T20:24:56+5:302023-04-20T20:25:36+5:30
इमारतीच्या मागील बाजूस गवंडी गिलावा करण्यात व्यस्त होते. गवंड्याने पाहिल्यावर ही घटना लक्षात आली.

धक्कादायक! घरच्या बांधकामावर पाणी मारताना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू
कसबा बीड - घराच्या बांधकामांवर पाणी मारत असताना विजेचा शॉक लागून गणेशवाडी (ता.करवीर) येथील तरूणाचा मृत्यू झाला. साहिल भिवा चव्हाण (वय १८) असे त्या तरूणाचे नाव आहे.तो कोपार्डे येथील स ब खाडे महाविद्यालयात आय टी आय मध्ये इलेक्ट्रीसियनचा कोर्स शिकत होता. सदरची घटना दुपारी तीन वाजता घडली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील लाड गल्लीत चव्हाण कुटुंबियांचे घराचे बांधकाम सुरू आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साहिल हा बांधकामावर पाणी मारण्यासाठी आला होता. मोटर चालू झाल्यावर साचलेल्या पाण्यातून विजेचा शॉक त्याच्या पायाला लागला. दुपारची वेळ असल्याने ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. इमारतीच्या मागील बाजूस गवंडी गिलावा करण्यात व्यस्त होते. गवंड्याने पाहिल्यावर ही घटना लक्षात आली. तातडीने त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. पण तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. साहिल हा मनमिळाऊ व खेळकर स्वभावाचा होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. घटनास्थळावरील वातावरण हृदय पिळवटून टाकणारे होते. साहिल च्या मागे आईवडील, भाऊ, चुलता, चुलती, आजी आजोबा असा परिवार आहे.