Kolhapur News: ज्योतिरादित्य सिंधियांकडे 'त्या' महिलेने केली 'अशी' मागणी की...,उपस्थितांना आवरले नाही हसू
By समीर देशपांडे | Updated: February 28, 2023 14:21 IST2023-02-28T14:20:55+5:302023-02-28T14:21:23+5:30
मागणी ऐकल्यानंतर मात्र सिंधिया यांच्यासह उपस्थितांना हसू आवरले नाही.

Kolhapur News: ज्योतिरादित्य सिंधियांकडे 'त्या' महिलेने केली 'अशी' मागणी की...,उपस्थितांना आवरले नाही हसू
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कांडगाव या खेडेगावातील एका महिलेने आमच्या गावाला विमान सुरू करा अशी मागणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे करून एकच धमाल उडवून दिली.
सिंधिया काल, सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर पासून जवळच असलेल्या सहा हजार लोकसंख्येच्या कांडगाव या गावी त्यांनी आज मंगळवारी सकाळी उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये त्यांनी उपस्थित ग्रामीण महिलांशी प्रभावीरीत्या संवाद साधला.
कार्यक्रम झाल्यानंतर या महिलांशी बोलताना एका महिलेने आमच्या कांडगावला विमान सुरू करा अशी मागणी केली आणि ही मागणी ऐकल्यानंतर मात्र सिंधिया यांच्यासह उपस्थितांना हसू आवरले नाही.
चंदगडमध्ये धरला लेझीमवर ठेका
मंत्री सिंधिया यांनी काल, सोमवारी चंदगड तालुक्यातील बसर्गे गावी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. हालगीच्या तालावर लेझीमचा ठेका धरत ते तल्लीन झाले होते. खासदार महाडिक यांनी सिंधिया यांना लेझीम खेळण्याचा आग्रह धरला आणि सिंधिया यांनीही हालगीच्या तालावर लेझीम खेळण्याचा आनंद लुटला.