आजरा : आजरा येथील संभाजी चौकात ट्रकने दिलेल्या भरधाव धडकेत चारचाकीसह दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातात चाफेगल्ली येथील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची रात्री वाहन तपासणी सुरू होते. भरधाव वेगाने ट्रक माल भरून गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता तर, दवाखान्यातून घरी जाणारे चाफेगल्ली येथील यादव कुटुंबियांना पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले होते. अचानक भरधाव आलेल्या कंटेनरने चारचाकीला जोराची धडक दिली. चारचाकी मधील संजय यादव व मसणाप्पा पोवार हे गंभीर जखमी तर कमल यादव, शुभम यादव, गोपाळ यादव हे किरकोळ जखमी झाले. अपघातात चारचाकी व एक मोटारसायकलचा चक्काचूर झाला असून हॉटेलच्या समोरील बाजूचेही नुकसान झाले आहे.
ट्रकने गाड्यांना धडका देत रस्त्याकडेला असलेला विजेचा खांबही पाडून टाकला आहे. सर्व जखमींना गडहिंग्लज व त्यानंतर कोल्हापूर येथे रात्रीच उपचारासाठी दाखल केले. कंटेनर चालक अभिषेक द्विवेदी (रा. बटाला लक्ष्मीपुरी, एकतानगर इंदूर मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास साजीद शिकलगार करीत आहेत.रात्रीच्या अपघातामुळे अनर्थ टळलाआजऱ्यातील संभाजी चौक नेहमी गजबजलेला असतो. वाहनांची व नागरिकांची ये-जा कायम सुरू असते. अपघात दिवसा झाला असता तर जीवितहानी झाली असती. मात्र अपघात रात्रीचा झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.