कोल्हापूर : चोरलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलून आणि बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची विक्री करणारे रॅकेट राज्यभर सक्रिय आहे. येथील मध्यवर्ती बसस्थानकापासून चोरलेल्या कारची राज्यात दहा ठिकाणी विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच शिवाजी पेठेतील तरुणाने खरेदी केलेली कार विकणाऱ्यांनीच काही तासांत चोरल्याची घटना घडली आहे. यात राज्यव्यापी टोळी सक्रिय असून, त्याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.राजेंद्रनगर येथील शाहू पार्कमध्ये राहणारे मुस्ताक गुलमोहम्मद दरवाजकर (वय ७१) हे गरजेनुसार पाचगावमधील एका कारचालकाला बोलवून घेत होते. ५ मे २०२५ रोजी बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी कारचालक स्वरूप रवींद्र कर्णिक (रा. शिवशंभो कॉलनी, पाचगाव) याला बोलवून घेतले. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ सोडल्यानंतर त्याला कार घरी पार्क करून चावी नातेवाइकांकडे देण्यास सांगितले होते. मात्र, दरवाजकर यांना सोडून गेलेला कारचालक कर्णिक तिथूनच कार घेऊन पसार झाला.त्याने ती कार एका तरुणाला विकली. पुढे नंबर प्लेट बदलून आणि बनावट कागदपत्रे तयार करून ती कार दहा ठिकाणी विकल्याचे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले. मुंबईत एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर कारच्या इंजिन चेसिस नंबरवरून शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे कारचे मालक दरवाजकर यांनी सांगितले.शिवाजी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये राहणारे राजवर्धन प्रताप पाटील (वय २८) यांना एका व्यक्तीने जुनी कार खरेदी करण्याची गळ घातली. १० ते १२ लाखांची कार अवघ्या तीन लाखांत मिळत असल्याने सोमवारी (दि. १५) त्यांनी कार खरेदी केली. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार केली. पैसे देऊन कारचा ताबा घेतला आणि त्याच रात्री उशिरा तिघांनी राजवर्धन यांच्या घराबाहेरून बनावट चावीने कार घेऊन पोबारा केला.मंगळवारी (दि. १६) सकाळी हा प्रकार लक्षात येताच त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ज्यांनी कारची विक्री केली त्यांनीच ती चोरल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, दिलीप गोराप्पा पोरे (रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा) याच्यासह अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल झाला.राज्यव्यापी टोळीकारची चोरी करणे, नंबर प्लेट बदलून बनावट कागदपत्रे तयार करणे, चोरलेल्या कारची पुन्हा विक्री करणे किंवा गहाणवट देणे आणि पुन्हा त्याच कार चोरणारी मोठी टोळी सक्रिय आहे. संपूर्ण राज्यभर या टोळीने अनेक गुन्हे केल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर येत आहे. कोल्हापुरातील काही आरोपींचा यात सहभाग आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अशा प्रकारचे २० गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Web Summary : A car theft racket operating statewide has been exposed in Kolhapur, with stolen vehicles sold using fake documents. Twenty cases are registered. Police are investigating the gang's widespread network and Kolhapur connections.
Web Summary : कोल्हापुर में राज्यव्यापी कार चोरी गिरोह का भंडाफोड़ हुआ, नकली दस्तावेजों का उपयोग करके चोरी के वाहन बेचे गए। बीस मामले दर्ज। पुलिस गिरोह के व्यापक नेटवर्क और कोल्हापुर कनेक्शन की जांच कर रही है।