कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील शिक्षकांना गंडा घालणारा जितेंद्र सदानंद चौराद (रा. शिवाजीनगर, बेळगाव) याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आठवड्यातील पाच दिवस रोज एक ते दोन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. दुसऱ्या योजनेतून एका महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. बेळगावमध्ये स्वत:ची कोट्यवधींची संपत्ती असल्याचे सांगून वर्षभर सोळांकूरमध्ये भाड्याच्या घरात राहणारा जितेंद्र सव्वातीन कोटी घेऊन पळाला. सोळांकूरमधील मित्राला पुढे करून त्याने फसवणूक केल्याचे तपासातून उघडकीस येत आहे.एस. आर. ट्रेडर्स कंपनीच्या माध्यमातून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवणारा जितेंद्र चौराद हा सोळांकूरमधील विवेक कांबळे या मित्राच्या ओळखीने राहायला आला होता. जून २०२१ ते मे २०२२ या कालावधीत तो सोळांकूरमध्ये भाड्याच्या घरात राहिला. कर्नाटक आणि महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असल्याचे सांगत त्याने एस. आर. ट्रेडर्स कंपनीचे कार्यालय सोळांकूरमध्ये सुरू केले. यातून गुंतवणूकदारांना आठवड्यातील पाच दिवस रोज एक ते दोन टक्के परतावा मिळेल असे सांगितले. दरमहा दामदुप्पट परतावा देण्याचेही आमिष दाखवले. त्याने हुशारीने नोकरदार वर्गाला लक्ष्य केले. कमी वेळेत जादा परतावा मिळविण्याच्या हव्यासाने काही शिक्षक त्याच्या गळाला लागले. सुरुवातीला दोन-तीन महिने परतावा देऊन त्याने गुंतवणूकदारांकडून मोठ्या रकमा उकळून पोबारा केला. त्याचा शोध सुरू असल्याचे राधानगरी पोलिसांनी सांगितले. तसेच एस. आर. ट्रेडिंग कंपनीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांनी केले आहे.बेळगावात कोट्यवधींची मालमत्ता?शिक्षकांना गंडा घालणाऱ्या जितेंद्रने बेळगावात स्वत:च्या मालकीची वडिलोपार्जित २५० एकर जमीन असल्याचे गुंतवणूकदारांना सांगितले होते. त्याशिवाय दोन कोटींचा बंगला आणि वडिलांचे मोठे हॉस्पिटल असल्याचे त्याने सांगितले होते. कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक असेल तर वर्षभर भाड्याच्या घरात राहून त्याने स्वत: गुंतवणूक गोळा करायचे काम का केले? असा प्रश्न आता गुंतवणूकदारांना पडू लागला आहे.फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यतासध्या केवळ एका शिक्षकाने फिर्याद देऊन त्यात १३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. आणखी काही जणांची फसवणूक झाली असून, बदनामीच्या भीतीने त्यांनी तक्रारी दिलेल्या नाहीत. फसवणुकीची रक्कम सहा कोटींपेक्षा जास्त असावी, असा गुंतवणूकदारांचा अंदाज आहे.
Kolhapur Crime: रोज एक ते दोन टक्के परताव्यास भुलले राधानगरीचे अनेक शिक्षक, वर्षभर भाड्याच्या घरात राहून घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:57 IST