इंदुमती गणेशकोल्हापूर : जिल्ह्यात कोठेही महापूर आलेला असो, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका असो, वन्यजिवांपासून संरक्षण, कोरोनाकाळातील मदतकार्य, साप, मगर सापडली त्यांना अधिवासात सोडणे असो, मोठमोठ्या यात्रांमध्ये गर्दी, वाहतुकीचे व्यवस्थापन असे विषय कोणतेही असोत; स्वत:च्या जिवाची पर्वा न करता मदतीसाठी सर्वांत पुढे असतात ‘आपदा मित्र’ व ‘सखी.’ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत १२ तालुक्यांमध्ये प्रत्येकी १०० ते १५० जवान अशी अडीच हजारांवर जवानांची तुकडी कार्यरत आहे. कंट्रोल रूमला फक्त आपला एक फोन गेला की काही मिनिटांत ते मदतीसाठी हजर!जिल्ह्यात २०१८ पासून ‘आपदा मित्र’ व ‘सखी’ कार्यरत आहेत. त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे बचावकार्याचे सगळे प्रशिक्षण व सुरक्षा किट पुरवण्यात आले. लगेच २०१९ मध्ये जिल्ह्यात महापूर आला. त्यात तसेच २०२१ च्या महापुरात या ‘आपदा मित्र‘ आणि ‘सखीं’नी प्रत्येक तालुक्यामध्ये नागरिक व जनावरांच्या बचावकार्याची मोठी जबाबदारी निभावली.त्यानंतर पाठोपाठ आलेल्या कोरोनामध्ये नागरिकांना क्वारंटाइन करण्यापासून त्यांच्यापर्यंत गरजेच्या वस्तू, जेवण पोहोचवणे, पोलिसांना बंदोबस्तामध्ये मदत, चेकपोस्टवरील तपासणी अशा सगळ्या कामांत आपदा मित्र आणि सखींनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केले. कुठे साप सापडला, कुठे मगर पाण्याबाहेर आली, वन्यजीव शहरात आले, कुणी पाण्यात बुडले, नागरिक पुरात अडकले, कुणी आत्महत्या केली... आपत्तीचा प्रकार कोणताही असो; शोध आणि बचावकार्यासाठी पहिले नाव आपदा मित्र व सखींचे येते.
जिवाची जोखीम; तरी नाही सुरक्षा कवचजिथे सर्वसामान्य माणूस जायलाही घाबरतो, अशा ठिकाणी हे लोक आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवतात, तरीही त्यांना आरोग्य विमा नाही, वारसांसाठी जीवन सुरक्षा विमा नाही. मानधन नाही. २०२२ मध्ये बीड येथील एका डॉक्टरचा धरणात बुडालेला मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या राज मोरेचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा शासनाकडून १० लाखांची मदत तसेच लोकसहभागातून ६० लाख रुपये असे ७० लाख रुपये कुटुंबीयांना देण्यात आले.
जिल्ह्यात कोणतीही आपत्ती येवो; आम्ही जिवाची पर्वा न करता २४ तास मदतकार्यासाठी उपलब्ध असतो. या कामाची दखल घेऊन पोलिस भरती,सैन्यभरतीसह शासकीय सेवांमध्ये भरती करताना त्याचा प्राधान्याने विचार व्हावा. किमान मदतीसाठी जो काही खर्च येतो, त्यासाठीचे मानधन मिळावे. - कृष्णात सोरटे (आपदा मित्र, आरे)
गेल्या सहा वर्षांपासून कॉलेजमध्ये शिकत मी ‘आपदा सखी’ म्हणून काम करते. आत्तापर्यंत किमान ३५ डेड बॉडी काढल्या आहेत. महापूर, काेरोना, यात्रा अशा कोणत्याही परिस्थितीत जिवाची जोखीम असते. अनेकजणांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. याचा विचार करून विमा कवच मिळावे. - शुभांगी घराळे (आपदा सखी, शुक्रवार पेठ)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपदा मित्र व सखींची तुकडी जिल्ह्यात कार्यरत असून, ते सर्व प्रकारच्या आपत्तींत मदतीसाठी सज्ज असतात. शासनाच्या निर्णयानुसार आता त्यांना विमा कवच दिले जाणार आहे. मानधनाबाबतही पुढील काळात सकारात्मक पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा आहे. - प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
Web Summary : Kolhapur's 'Aapda Mitra' and 'Sakhi' teams, 2500 strong, are first responders during floods, accidents, and even COVID-19. Despite risking their lives, they lack insurance and adequate compensation. The administration is considering providing insurance coverage.
Web Summary : कोल्हापुर में 2500 'आपदा मित्र' और 'सखी' बाढ़, दुर्घटनाओं और कोविड-19 में भी पहले प्रतिक्रियाकर्ता हैं। जान जोखिम में डालने के बावजूद, उनके पास बीमा और उचित मुआवजा नहीं है। प्रशासन बीमा कवरेज देने पर विचार कर रहा है।