Kolhapur News: हातात पिशवी असल्याने भटक्या कुत्र्याने पाठलाग केला, चिमुकला गंजीत लपला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:02 IST2025-11-06T16:01:24+5:302025-11-06T16:02:14+5:30
मुलगा शाळेत आला नसल्याचे समजताच शोधाशोध सुरु झाली

Kolhapur News: हातात पिशवी असल्याने भटक्या कुत्र्याने पाठलाग केला, चिमुकला गंजीत लपला, अन्...
कोपार्डे : अवघ्या सात-आठ वर्षाचा चिमुकला. हातात पिशवी असल्याने भटक्या श्वानाने त्याचा पाठलाग केला. घाबरून तो जवळच असलेल्या पिंजराच्या गंजीत लपून बसला. पण, मुलगा शाळेत आलेला नाही, असे पालकांना समजले आणि न हरवलेल्या मुलाची बातमी ऐकून सारे गाव हादरले. शेवटी चार-पाच तासांनी श्वानापासून सुरक्षित असल्याचे पाहून तो बाहेर आला आणि या नाट्यावर पडदा पडला. ही घटना मंगळवारी शिंदेवाडी (ता. करवी) येथे घडली. रणवीर प्रकाश पाटील असे या मुलाचे नाव आहे.
रणवीर हा घरातून शाळेला निघाला. पण, भटक्या श्वानांनी त्याच्या हातातील पिशवी पाहून झडप घातली. प्रथम त्याच्या पायाला श्वानाने चावा घेतला. पण, मुलाने हिमतीने हल्ल्यातून सुटका करून घेत जवळच असलेल्या पिंजराच्या गंजीत लपून बसला. श्वान या गंजीजवळच घुटमळत राहिल्याचे पाहून रणवीर तसाच गंजीत लपून बसला.
रणवीर शाळेत पोहचला नसल्याचे घरी समजल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. सोशल मीडियावर रणवीरचा फोटो व खाली तो हरवल्याची पोस्ट व आढळल्यास खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले. आई, वडील व नातेवाइक कासावीस झाले. सर्वांनी पै-पाहुण्यांशी संपर्क केला. मोटरसायकल घेऊन परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला.
गंजीभोवती घुटमळणारे श्वान निघून गेल्यानंतर रणवीर हळूच गंजीतून बाहेर आला. तो गावातीलच एक महिलेला दिसला. तिने रणवीरला घरी सुरक्षित पोहच केले. जिवावर आले ते पायावर निभावले. श्वानाच्या रुपाने काळ आला होता. पण, वेळ आली नव्हती, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त झाली.