Kolhapur: १५ लाख द्या, थेट मंत्रालयातून नियुक्तीपत्र घ्या, महापालिकेत भरतीआधीच गंडवणारी टोळी सक्रिय

By भीमगोंड देसाई | Published: July 20, 2023 01:54 PM2023-07-20T13:54:24+5:302023-07-20T13:56:44+5:30

आमदारांच्या पत्राचीही मागणी

A cheating gang is active in Kolhapur Municipal Corporation even before the recruitment process starts | Kolhapur: १५ लाख द्या, थेट मंत्रालयातून नियुक्तीपत्र घ्या, महापालिकेत भरतीआधीच गंडवणारी टोळी सक्रिय

Kolhapur: १५ लाख द्या, थेट मंत्रालयातून नियुक्तीपत्र घ्या, महापालिकेत भरतीआधीच गंडवणारी टोळी सक्रिय

googlenewsNext

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : येथील महापालिकेचा नवीन आकृतीबंध शासनाने मंजूर करून भरतीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच बेरोजगारांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका पदासाठी पंधरा लाखांचा दर काढला आहे. रोख पैशांसह स्थानिक आमदाराचे पत्र आणून दिल्यानंतर मंत्रालयातून नियुक्तीचे पत्र दिले जाईल, असे आमिष दाखवले जात आहे. याचा मुख्य सूत्रधार मिरज येथे असल्याचे सांगितले जाते. मात्र महापालिकेतील नोकर भरती सरळसेवा, पदोन्नतीने होणार आहे. यामुळे कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

महापालिकेत ५ हजार ४४ पदे मंजूर आहेत. यातील २ हजार ५५ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांची संख्या प्रत्येक महिन्याला वाढत आहे. रिक्त जागा आणि नव्याने निर्माण होणारी ४२७ पदांची मेघाभरती होणार आहे. याचा महापालिकेने तयार केलेला नवीन आकृतीबंध मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. शासकीय पातळीवर मंजुरीविना प्रलंबित आहे.

दरम्यान, अजून रिक्त जागा आणि नव्याने निर्माण होणाऱ्या जागा किती आहेत, कोणत्या विभागात किती जणांची नियुक्ती होणार हे स्पष्ट नाही. तरीही कोल्हापूर महापालिकेत नोकरीसाठी पंधरा लाख रुपये मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. चांगली ओळख असेल तर पाच लाखात काम करतो. पहिल्यांदा दोन लाख रुपये द्यायचे आणि काम झाल्यानंतर तीन लाख द्यायचे, पैसे रोखच द्यायचे, त्यासोबत स्थानिक आमदाराचे पत्र आणायचे, अशी अट फसवणूक करणाऱ्यांकडून घातली जात आहे. अशाप्रकारे कोणालाही यापूर्वी नोकरी मिळालेली नाही. यामुळे फसवणूक करण्यासाठी असे तंत्र वापरले जात आहे.

सरळसेवेनुसार नोकरी

महापालिकेत नोकरी कोणीतरी सांगितले, वशिला लावल्यानंतर मिळेल अशी सध्याची व्यवस्था नाही. सरळसेवा आणि बढतीने जागा भरण्यात येतात. याची संपूर्ण प्रक्रिया मंत्रालय पातळीवरून चालते. यामुळे नोकरीसाठी कोणालाही पैसे द्यायची आवश्यकता नाही. सरळसेवेत पात्रता आणि गुणवत्तेनुसारच नोकर भरती होणार आहे. यामुळे बेरोजगार तरुणांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, नोकरीसाठी कोणालाही पैसे देऊ नये, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

महापालिकेचा नवीन आकृतीबंध शासनाकडे पाठवला आहे. तो अजून मंजूर झालेला नाही. कोणत्याही पदाची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. बेरोजगारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. - रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: A cheating gang is active in Kolhapur Municipal Corporation even before the recruitment process starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.