कोल्हापूर : करवीर तालुक्यातील आरे येथे घरात खेळताना जिन्यात अडकवलेल्या दोरीचा गळफास लागून समर्थ अरुण वरुटे (वय ९) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २३) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या समर्थचा हकनाक बळी गेल्याने वरुटे कुटुंबीयांना धक्का बसला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.आरे ग्रामस्थ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ हा आई, वडील, सातवीत शिकणारा मोठा भाऊ अथर्व, चुलते आणि चुलतीसोबत शेतातील घरात राहत होता. त्याच्या वडिलांचे गावात किराणा दुकान आहे. वडील दुकानात गेले होते, तर आई शेतात गेली होती. सकाळच्या शाळेनंतर समर्थ आणि अथर्व हे दोघेच घरी होते. दोघे दोरी हातात घेऊन खेळत होते. समर्थने हातातील दोरी जिन्याच्या लोखंडी बारला बांधली. त्यावेळी अथर्व घराबाहेर खेळायला गेला. काही वेळाने अथर्व आत जाताच त्याला समर्थ दोरीला लटकल्याचे दिसले.त्याने आरडाओरडा करत जवळच शेतात मका काढत असलेले चुलते अभिजित वरुटे यांना हाका मारल्या. त्यांनी धावत येऊन गळफास सोडवला. वडिलांना बोलवून घेऊन समर्थला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
खेळता खेळता होत्याचे नव्हते झालेशाळेत चुणचुणीत असलेला समर्थ मनमिळाऊ आणि घरात सर्वांचा लाडका होता. त्याला प्राण्यांची आवड होती. घरातील मांजरासाठी चिकन आणण्यासाठी त्याने ५० रुपये घेतले होते. गळफास लागल्यानंतर त्याच्या हातातील पैसे खाली पडले. काही मिनिटांसाठी मोठा भाऊ बाहेर गेला आणि तेवढ्यात समर्थला गळफास लागून होत्याचे नव्हते झाले.
सहा एप्रिलला झाला वाढदिवससहा एप्रिलला त्याचा वाढदिवस झाला. घरात केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे त्याचे फोटो वडील आणि चुलत्याच्या मोबाइलवर होते. नुकत्याच झालेल्या गावातील यात्रेतही त्याने काढलेले फोटो मोबाइलमध्ये होते. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मोबाइलमधील त्याचे फोटो पाहून वडील आणि चुलत्यांनी सीपीआरमध्ये हंबरडा फोडला.