कोल्हापूर, सांगलीतून ८९४ नमुने तपासणीसाठी पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 20:20 IST2021-01-14T20:19:35+5:302021-01-14T20:20:52+5:30
Bird Flu Kolhapur-बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूर व सांगलीतून आतापर्यंत ८९४ नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेला पाठवले आहेत. दरम्यान, कोल्हापुरात अजूनही एकही मरतूक नसली तरी, लोकांकडून मागणी कमी झाल्याने चिकन व अंड्यांच्या दरातील घसरण मात्र सुरूच आहेच. याचा कोट्यवधीचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे.

कोल्हापूर, सांगलीतून ८९४ नमुने तपासणीसाठी पुण्याला
कोल्हापूर : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूर व सांगलीतून आतापर्यंत ८९४ नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेला पाठवले आहेत. दरम्यान, कोल्हापुरात अजूनही एकही मरतूक नसली तरी, लोकांकडून मागणी कमी झाल्याने चिकन व अंड्यांच्या दरातील घसरण मात्र सुरूच आहेच. याचा कोट्यवधीचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे.
बर्ड फ्लूचा संसर्ग परदेशातील स्थलांतरित पक्ष्यांमार्फत राज्यात सुरू झाला आहे. कोल्हापूर, सांगलीत त्याचा अद्याप मागमूसही नाही. पण पशुसंवर्धन विभागाने काटेकोर नियोजन सुरू केले आहे. रोजच्या रोज आजारी कोंबड्यांचे स्त्राव तपासणीसाठी घेणे, ते पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठवणे, रोज सायंकाळी पशुसंवर्धन आयुक्तांना व्हीसीद्वारे दैनंदिन अहवाल देणे आदी कामांच्या माध्यमातून बर्ड फ्लूवर लक्ष ठेवले जात आहे.
तथापि आतापर्यंत बर्ड फ्लूमध्ये मानवाचा मृत्यू झाला आहे, अशी एकही घटना राज्यात अथवा कोल्हापुरातही घडलेली नाही. शिवाय मरतूक म्हणून कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचीही नोंद नाही. तरीदेखील याचा बागुलबुवा उभा केला जात असल्याने पोल्ट्री व्यवसायावर संक्रांत आली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक आणि कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या या उद्योगात सध्या भीतीचे वातावरण आहे.
बर्ड फ्लूचा अपप्रचार वाढेल तसा चिकन व अंड्यांच्या दरात घट होत चालल्याचे दिसत आहे. चार दिवसांपूर्वी होलसेलचा चिकनचा ९६ रुपये किलो असणारा दर आता ५८ रुपयांपर्यंत खाली आला आहे. किरकोळ दरही ९० ते १०० रुपये किलोवर आले आहेत. ६५ रुपये डझन असणारी अंडी ५५ रुपयांवर आली आहेत.