'संविधानाविरोधातील शत्रूंचा ताकदीने मुकाबला करणार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 15:46 IST2021-11-24T15:45:48+5:302021-11-24T15:46:39+5:30
कोल्हापूर : संविधानाविरोधातील ज्या धर्मांध शक्ती शत्रू आहेत. त्यांच्याशी ताकदीने मुकाबला करण्याचा निर्धार ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे ...

'संविधानाविरोधातील शत्रूंचा ताकदीने मुकाबला करणार'
कोल्हापूर : संविधानाविरोधातील ज्या धर्मांध शक्ती शत्रू आहेत. त्यांच्याशी ताकदीने मुकाबला करण्याचा निर्धार ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारांच्या वारसदारांनी बुधवारी सकाळी केला. कॉम्रेड पानसरे यांच्या ८८ व्या जयंतीदिनी त्यांना मॉर्निंग वॉकने अभिवादन करण्यात आले.
येथील सागरमाळ आयडियल सोसायटीमधील त्यांच्या निवासस्थानी सकाळी आठ वाजता डाव्या चळवळीतील कार्यकर्ते, त्यांच्या विचारांचे वारसदार जमले. तेथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कॉम्रेड पानसरे यांचे विचार पुढे घेऊन जाणे हेच आपले सर्व कार्यकर्त्यांचे ध्येय, उद्दिष्ट आहे. सध्या धर्मांधता आणि हिंसा देशभरात वाढली आहे. त्याचा मुकाबला कॉम्रेड पानसरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणून ताकदीने करण्याचा निर्धार आम्ही जयंतीदिनी केला असल्याचे डॉ. मेघा पानसरे यांनी सांगितले.
दरम्यान, आयडियल सोसायटीपासून सुरू झालेल्या मॉर्निंग वॉकची वि. स. खांडेकर विद्यालयाजवळील पानसरे यांच्या नियोजित स्मारकाजवळ सांगता झाली. ‘कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे’, ‘पानसरे यांच्या मारेकऱ्यांना न पकडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, आदी घोषणांनी परिसर दुमदुमला. नामदेव गावडे, सुरेश शिपुरकर, एस. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर सदाशिव निकम, कृष्णात स्वाती यांनी स्फूर्तीदायक पोवाडे गायले. रघुनाथ कांबळे, अनिल चव्हाण, स्वाती कृष्णात, आनंदराव परूळेकर, सुभाष वाणी, उमेश सूर्यवंशी, मुकुंद कदम, राजा यादव, संजय सदलगकर, मल्हार पाटील, इस्माईल शेख, सुरेश सावंत उपस्थित होते.