शिक्षकांच्या ८१७ जागा रिक्त;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:36 IST2020-12-14T04:36:06+5:302020-12-14T04:36:06+5:30
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील खेळखंडोबा संपत नसल्याची परिस्थिती अजूनही कायम असून कोल्हापूर जिल्ह्यात बाराही तालुक्यांत ८१७ प्राथमिक शिक्षकांच्या जागा ...

शिक्षकांच्या ८१७ जागा रिक्त;
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील खेळखंडोबा संपत नसल्याची परिस्थिती अजूनही कायम असून कोल्हापूर जिल्ह्यात बाराही तालुक्यांत ८१७ प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत; तर ज्यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करायचे, त्या मुख्याध्यापकांच्याही ५६ जागा अजून भरलेल्या नाहीत.
एकीकडे प्राथमिक शाळा आणि शिक्षकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात असताना, पुरेसे शिक्षक देण्यासाठी मात्र शासनाचे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती गेली काही वर्षे कायम असून, या क्षेत्राविषयी शासनाची अनास्था का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अनेक शिक्षकांच्या या जागा रिक्त असल्यामुळे कार्यरत शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून त्याचा विपरीत परिणामही दिसून येत आहे. त्यातूनही कोल्हापूर जिल्हा शिष्यवृत्तीमध्ये अव्वल ठरत आहे. या प्राथमिक शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत किमान मंजूर पदे तरी भरण्याची तसदी शासनाने घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यासाठी ७९६७ शिक्षंकाची पदे मंजूर असून त्यांपैकी ८१७ रिक्त आहेत. मुख्याध्यापक पदे ५१२ मंजूर असून त्यांतील ५६ रिक्त आहेत.
चौकट
केंद्रप्रमुखांच्या कामाचा ताण इतरांवर
जिल्ह्यासाठी केंद्रप्रमुखांची एकूण १७१ पदे मंजूर असून त्यांपैकी तब्बल १४२ पदे रिक्त आहेत. १० प्राथमिक शाळांच्या समन्वयाचे काम केंद्रप्रमुखांकडे असते. जिल्हा परिषदेकडून आलेली परिपत्रके, आदेश, आकडेवारीची देवाणघेवाण यांसारखी महत्त्वाची कामे त्यांच्याकडे असतात. मात्र मोठ्या संख्येने ही पदे रिक्त असल्याने अन्य हौशी शिक्षकांवर या कामाचा भार पडत आहे. मात्र त्याचा परिणाम अध्यापनावरही होऊ शकतो, याचा विचार होण्याची गरज आहे.
तालुकावार शिक्षकांच्या रिक्त जागा
आजरा ४०, भुदरगड ७०, चंदगड ७०, गगनबावडा २७, गडहिंग्लज ४५,
हातकणंगले ६८, कागल ९१, करवीर ५२, पन्हाळा ८४, राधानगरी ७९, शिरोळ १४७, शाहूवाडी ४४.
कोट
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर या कामाचा अतिरिक्त कार्यभार पडत आहे. शासनाने याबाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
संभाजी बापट
जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ