वीरशैव बँकेच्या १९ जागांसाठी ६३ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:30+5:302021-01-13T05:04:30+5:30
कोल्हापूर : वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ४० जणांनी ६३ अर्ज दाखल केले ...

वीरशैव बँकेच्या १९ जागांसाठी ६३ अर्ज
कोल्हापूर : वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ४० जणांनी ६३ अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी केवळ दोघांनी तीन अर्ज दाखल केल्याने हा गट बिनविरोध होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे काम पाहत आहेत.
वीरशैव बँकेसाठी ६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. १९ जागांसाठी ४० जणांनी ६३ अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक अर्ज सर्वसाधारण गटात ३५ जणांनी ५५ अर्ज दाखल केले आहेत. महिला राखीव गटात दोन जागांसाठी पाच अर्ज, तर अनुसूचित जाती गटातून दोघांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. सत्तारूढ गटांतर्गत हालचाली व बँकेचा पोटनियम पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
महिला व अनुसूचित जाती हे दोन गट बिनविरोध होण्यास काहीच अडचण नाही. उद्या, गुरुवारपासून २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. जागेएवढेच म्हणजे १९ अर्ज शिल्लक राहिले तर बँकेच्या २५ जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत बिनविरोधची घोषणा होऊ शकते. जादा अर्ज शिल्लक राहिले तर ७ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.