जिल्ह्यात ६१ बल्क कुलर्स उभारणार
By Admin | Updated: November 24, 2014 23:58 IST2014-11-24T23:35:25+5:302014-11-24T23:58:39+5:30
दिलीप पाटील : धारवाड, बंगलोर येथून गाय-म्हैस खरेदीसाठी ‘गोकुळ’चे अनुदान

जिल्ह्यात ६१ बल्क कुलर्स उभारणार
कोल्हापूर : दूध संकलनामध्ये वाढ व त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोकण व कर्नाटकातील काही भागांत क्लस्टर बल्क कुलर्स बसविण्यात आले आहेत. नॅशनल डेअरी प्लॅन अंतर्गत जिल्ह्यातील ४२ गावांत ६१ बल्क कुलर्सला मान्यता मिळाल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच धारवाड व बंगलोर येथून गाय, म्हैस खरेदी करणाऱ्या उत्पादकाला अनुदान सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पाटील म्हणाले, दूध उत्पादक व ग्राहक यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून ‘गोकुळ’ने वाटचाल सुरू केली असून, बाजारपेठेत ‘गोकुळ’च्या दुधाची मागणी वाढली आहे; पण त्या पटीत संकलन वाढत नसल्याने बाहेरील जिल्ह्यातून दूध खरेदी करावे लागत आहे. सध्या सरासरी सात लाख ६० हजार लिटरचे संकलन होते. आगामी काळात मुक्त गोठा संकल्पनेस प्रोत्साहन देणार आहे.
संघामार्फत गुजरात येथून म्हैस खरेदीसाठी आठ हजार, तर हरियाणासाठी दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. त्याचबरोबर धारवाड येथून म्हैस, गाय खरेदीसाठी चार हजार, तर बंगलोर येथून गाय खरेदीसाठी पाच हजार रुपये अनुदान देण्याची योजना सुरू आहे. संकलन वाढीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वासरू संगोपन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सात कोटी ६१ लाख ४० हजार इतके अनुदान देण्यात आले असून, दुसऱ्या वेतासाठीही गायीसाठी एक हजार, तर म्हैशीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिले जात आहे. गडहिंग्लज येथे एक्सरे मशीन बसविण्यात येणार असून, बोरवडे व कोल्हापूर येथेही एक्सरे मशीन बसविण्याचे विचाराधीन असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, दिनकरराव कांबळे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, उपमहाव्यवस्थापक आर. जी. पाटील, मोहन यादव उपस्थित होते.
उत्पादकांना भरघोस दरवाढ
वाढती महागाई व दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी संघाने अहवाल सालात तीनवेळा म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ केली आहे. आतापर्यंत साडेचार रुपये प्रतिलिटर उत्पादकाला वाढ दिल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
भविष्यकालीन योजना
४० हजार आदर्श उत्पादक तयार करणे.
एन.डी.डी.बी.च्या साहाय्यातून राज्यात एकमेव चारा कारखाना उभारणे.
‘गोकुळ’ची हाताळणी क्षमता सात लाख लिटर्सवरून १२ लाख लिटर्स करणे.
सर्व शीतकरण केंद्रांवर मिनी प्रयोगशाळा चालू करणे.