निट्टूर येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ६ शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:14+5:302020-12-05T04:57:14+5:30
निट्टूर येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ६ शेतकरी जखमी चंदगड/प्रतिनिधी : निट्टूर (ता. चंदगड) येथे मळणी काढण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाश्यांनी ...

निट्टूर येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ६ शेतकरी जखमी
निट्टूर येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ६ शेतकरी जखमी
चंदगड/प्रतिनिधी : निट्टूर (ता. चंदगड) येथे मळणी काढण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याने एक पुरुष आणि पाच महिला जखमी झाल्या. या जखमींवर कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. निट्टूर येथील जवळपास १५ स्त्री आणि पुरुष मलतवाडी गावाजवळ असणाऱ्या अंबू नावाच्या शेतात भाताची मळणी काढण्यासाठी गेले होते. शेतात जाऊन मळणीला सुरुवात करण्यापूर्वीच शेतातील माकडांनी झाडावर अगोदरच असलेल्या कोंडग्या जातीच्या मधमाश्यांना त्रास देऊन उठवले, संतापलेल्या मधमाश्यांनी मळणीसाठी आलेल्या सर्व शेतकऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. अचानक मधमाश्यांनी हल्ला चढवल्याने सर्वजण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पुरुष उसात लपल्याने मधमाश्यांपासून बचावले, पण महिलांना पळता न आल्याने त्या या मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. सुप्रिया नामदेव पाटील (वय ४२), नम्रता कल्लापा पाटील ( ३३), अनुसया नरसू पाटील (६५) या जखमी झालेल्या महिलांवर प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड येथे उपचार करण्यात आले. शालन भैरू पाटील (४०), रेणुका शिवाजी पाटील (३१) व विलास भैरू पाटील (४२) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबरोबरच डॉ. संदेश जाधव (कुदनूर) यांनीही जखमींवर उपचारासाठी मदत केली.