तरुणांची ५३ लाखांची फसवणूक
By Admin | Updated: July 2, 2014 00:41 IST2014-07-02T00:37:29+5:302014-07-02T00:41:36+5:30
नोकरीचे आमिष : निलंबित पोलिसासह चौघांवर नेसरी पोलिसांत गुन्हा

तरुणांची ५३ लाखांची फसवणूक
नेसरी : आरोग्य खात्यातील लिपिक, टेलिफोन आॅपरेटर व अन्य रिक्त जागा भरण्याचे आमिष दाखवून नेसरी, आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यासह मुंबई, अंधेरी, चेंबूर आदी ठिकाणच्या तरुणांची ५३ लाख ३४ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद नेसरी पोलिसांत नोंद झाली. गजानन ऊर्फ गणेश बंडोपंत तांबट (रा. इचलकरंजी), श्रीमती ज्योती किर्तीकुमार गायकवाड, योगेश प्रभाकर अहिरे (रा. इचलकरंजी) व बजरंग टिपुगडे यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला असून, यातील तांबट हा सशंयित निलंबित पोलीस कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. नेसरीतील रामचंद्र तुकाराम सुतार (वय ४८) यांनी या चौघांविरोधात आज, मंगळवारी फिर्याद दाखल केली आहे.
नेसरी पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, १६ नोव्हेंबर २०१३ ते ११ जून २०१४ दरम्यानच्या मुदतीत नेसरी, माणगाव, गडहिंग्लज, मुुंबई, चेंबूर, अंधेरी आदी ठिकाणी वरील आरोपी व त्यांच्या साथीदारांनी आरोग्य खात्यातील लिपिकांच्या रिक्त जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी प्रत्येकी सहा लाख रुपये दर आहे. याशिवाय टेलिफोन आॅपरेटर व हॉस्पिटलमध्ये अन्य जागा भरीत असल्याच्या जाहिराती दाखविल्या.
फिर्यादी व त्यांच्या साथीदारांचा वरील संशयित आरोपींनी विश्वास संपादन केला. त्यानुसार त्यांच्याकडून काही रक्कम रोख घेतली, तर काही रक्कम बोगस खात्यावर भरण्यास सांगून लाखो रुपयांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली.विशेष म्हणजे त्यांनी विविध पदे भरण्याच्या जाहिराती तरुण व त्यांच्या नातेवाइकांना दाखविल्या. व काही रक्कम रोखीने, तर काही रक्कम बँकेतील खात्यावर जमा करण्यास सांगितली. नोकरीच्या आमिषाने यातील तरुणांच्या पालकांनी ती रक्कम भरली. आरोपींनी नंतर ती एटीएमद्वारे काढून घेतली. तसेच काही संशय येऊ नये म्हणून त्यांनी मुंबई येथील एका हॉटेलात बोलावून घेऊन तरुणांना बोगस अधिकाऱ्यांची भेट घडवली असल्याची चर्चा आहे. यातील तांबट याला कर्नाटकमध्ये अपहरण व पे्रयसीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक झाली होती. (वार्ताहर)