पाईपलाईनमध्ये ५० पैशांचे गणित

By Admin | Updated: July 3, 2014 00:53 IST2014-07-03T00:53:04+5:302014-07-03T00:53:47+5:30

कोल्हापूर महापालिकेत खुमासदार चर्चा : नगरसेवकांना हवाय प्रत्येकी ५ लाखांचा हिस्सा

50 paise math in pipeline | पाईपलाईनमध्ये ५० पैशांचे गणित

पाईपलाईनमध्ये ५० पैशांचे गणित

संतोष पाटील ल्ल कोल्हापूर
शहरवासीयांचे तीन दशकांचे स्वप्न असलेल्या थेट पाईपलाईन योजनेचा मार्ग ‘क्लिअर’ झाल्यानंतर शुभारंभाचा नारळ फुटण्याच्या मार्गावर आहे. या योजनेतून प्रत्येकी किमान ५ लाखांचा ‘आंबा’ पाडण्याची नगरसेवकांची अपेक्षा होती. त्यानुसारच या योजनेत अधिकाऱ्यांनी ५० पैशांचे गणित सोडविल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप यातील कांहीच वाटा नगरसेवकांपर्यंत पोहोचला नसल्याने थेट नेत्यांच्या कार्यक्रमावरच बहिष्काराची भाषा अनेकांनी सुरू केल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे.
महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी निविदा ठरलेली ही ४८९ कोटींची योजना नगरसेवकांच्या दृष्टीने कोरडीच ठरत आहे. अशाप्रकारच्या योजनेतून किमान १ रुपयाचा हिस्सा गृहीत धरला तरी रक्कम पाच कोटींच्या घरात जाते. ५० पैशांनी हिशेब केला तरी अडीच कोटी होतात. पाच पैशांचा हिस्साही २५ लाख होतो. नगरसेवकांना पहिल्यापासूनच या योजनेतून किमान पाच लाखांचे आमिष दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. कारकिर्दीची शेवटची दीड वर्षे राहिली आहेत. यानिमित्ताने किमान मुहूर्त तरी होईल, अशी अपेक्षा अनेकजण बाळगून होते. थेट नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने योजनेच्या मंजुरीवर सभागृहास मोहर उठविणे भाग पडले. किमान नया पैशाचा हिस्सा सेवकांना मिळाला, तरी प्रत्येकी पाच लाख पदरात पडणार आहेत.
दरम्यान, थेट पाईपलाईनवरून महापालिकेत अनेक उलट-सुलट चर्चा सुरू आहे. योजनेचे श्रेय गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मिळून त्याचा राजकीय लाभ मिळणार म्हटल्यावर राजकीय धुळवड सुरू झाली. ‘ढपल्याची जाहीर वाच्यता करण्याबरोबर हस्तकांकरवी नगरसेवकांना चलबिचल करण्याचे कारस्थानेही रचली जाऊ लागली आहेत.
‘अमूक कारभाऱ्याने पाच पैसे मिळविले’, ‘अधिकाऱ्यांनी मिळून एक रुपयाचे गणित सोडविले’,‘आमच्याकडे बघितले नाही तर नेत्यांच्या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकणार’ अशी सेवकांची भाषा खासगीत सुरू आहे. अनेकांनी थेट पाईपलाईनमधून आपल्या पद्धतीने आर्थिक गणिते सोडविण्यास सुरुवात केली असली तरी नगरसेवकांना पडत असलेली गणिते कशी सोडवायची, असा सवाल नेत्यांसमोर उभा आहे.
रंकाळ्यासाठी कोटीचा निधी
निविदा प्रसिद्ध; विसर्जन कुंड, एलईडी, इराणी खणीचा विकास करणार
कोल्हापूर : शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कोटीचा निधी मिळाला आहे. या निधीतून २१ फुटी गणेश विसर्जनासाठी इराणी खण परिसराचा विकास, तांबट कमानीजवळ घरगुती गणेश विसर्जनासाठी कुंडांची उभारणी, तसेच रंकाळ्याभोवती एलईडी लाईट लावली जाणार आहे. या कामांसाठी निविदा काढण्यात आली आहे. प्रक्रिया पूर्ण होताच काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली आहे.
शहरातील सार्वजनिक मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन रंकाळा परिसरातील इराणी खणीत केले जाते. २६८ मोठ्या तसेच घरगुती अशा दरवर्षी किमान ५५०० गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातात. मूर्ती विसर्जनामुळे शेवटची घटका मोजत असलेल्या रंकाळा परिसरातील इराणी खणीचा गाळ काढण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली. यासाठी स्थायी समितीने ‘विशेष बाब’ म्हणून पाच लाखांची तरतूद केली. मात्र, निधी कमी पडल्याने काम रखडले. २५० फूट लांबी असणाऱ्या या खणीच्या संपूर्ण स्वच्छता तसेच मूर्तींचे विसर्जन सोपे व्हावे, अशा पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १७ लाख ४९ हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे.
तलावावर दहा ठिकाणच्या काहिलींत सुमारे २५ हजार मूर्ती विसर्जीत केल्या जातात. तांबट कमान येथे गणेश विसर्जन कुंड व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी ३३ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

Web Title: 50 paise math in pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.