शिरोळमधील ४७ सहकारी संस्था अवसायनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:13+5:302021-03-06T04:22:13+5:30
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ४७ सहकारी संस्था अवसायनात गेल्या आहेत. याबाबत सहकारी संस्था कार्यालयाकडून कार्यवाही सुरू आहे. आक्षेप नोंदविण्याची ...

शिरोळमधील ४७ सहकारी संस्था अवसायनात
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ४७ सहकारी संस्था अवसायनात गेल्या आहेत. याबाबत सहकारी संस्था कार्यालयाकडून कार्यवाही सुरू आहे. आक्षेप नोंदविण्याची मुदत शुक्रवारी संपली. आठ ते दहा वर्षांपूर्वीच्या या संस्था असून, ज्यांच्याकडून आक्षेप सादर झाले नाहीत, त्या संस्थांची नोंदणी रद्द होणार आहे.
सहकारी संस्थांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. सहकार कायदा, नियम, संस्थेचे उपविधी आणि मार्गदर्शक सूचना व सरकारच्या धोरणात्मक निर्णयास अधिन राहून काम करणे अपेक्षित असताना काही संस्थांच्या कामकाजात आढळून आलेल्या त्रुटींमुळे तालुक्यातील ४७ सहकारी संस्था अवसायनात गेल्या आहेत.
जयसिंगपूर, अब्दुललाट, यड्राव, शिरोळ, उदगांव, अकिवाट यांसह अन्य गावातील संस्थांचा यामध्ये समावेश आहे. सहकार कायद्यानुसार निवेदन सादर करून या संस्थांना ५ मार्चअखेर लेखी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. त्यामुळे ज्या सहकारी संस्थांनी आपल्या हरकती नोंदविलेल्या नाहीत त्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे. १५ मार्चला आमसभा घेऊन संस्थेची अधिकृत नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती सहायक निबंधक कार्यालयातून देण्यात आली.