महिलांना ३५ लाखांचा गंडा

By Admin | Updated: July 4, 2015 00:45 IST2015-07-04T00:42:52+5:302015-07-04T00:45:50+5:30

अंबप परिसरातील प्रकार : ११४ महिलांच्या नावे काढली कर्जे; पाचजणांविरुद्ध गुन्हा

35 lakhs for women | महिलांना ३५ लाखांचा गंडा

महिलांना ३५ लाखांचा गंडा

पेठवडगाव : विविध बँका व संस्थांचे कर्ज ११४ महिलांच्या नावावर काढून त्या कर्जाचे हप्ते फेडण्याचे आमिष दाखवून सुमारे ३५ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा शुक्रवारी पेठवडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाला. याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य संशयित सुजाता रघुनाथ कांबळे, तिचा जावई अतुल आनंदा अंबपकर, तिची मुलगी रचना अतुल अंबपकर, तिची दोन मुले रविकिरण, रणजित कांबळे अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद ग्रामपंचायत सदस्या नंदिनी संजय कांबळे यांनी पोलिसांत दिली.
पोलिसांनी सांगितले की, अंबप येथील नंदिनी कांबळे या ग्रामपंचायत सदस्या आहेत. जानेवारी २०१५ च्या दरम्यान, सुजाता कांबळे हिने आठ ते दहा पतसंस्था, बँकांमधून कर्जे मंजूर करून देतो, असे सांगितले. तसेच नंदिनी कांबळे यांना बचत गट तयार करूया, असे सांगितले. नंदिनी कांबळे यांच्या नावे सुजाता कांबळे हिने रत्नाकर बँकेचे २५ हजारांचे कर्ज मंजूर करून घेतले. हे पैसे सुजाताने जावई अतुल अंबपकर यांचा व्यवसाय आहे, असे सांगून पैसे काढून घेतले. घेतलेल्या कर्जाचे नियमित हप्ते भरण्याचे आश्वासन दिले. तसेच नंदिनी कांबळे यांच्याच नावे ग्रामशक्ती फायनान्सचे २४ हजार, श्रमशक्ती पतसंस्थेचे
१० हजार, अस्मिता फायनान्स व शिवम सहकारी बँकेचे प्रत्येकी २० हजार, अंबप वाहनधारक पतसंस्थेचे १५ हजार, निर्वासीचे दोन हजार असे
१ लाख ११ हजार रुपयांचे कर्ज काढले.
हे सर्व कर्ज फेडतो, असे सांगून नंदिनी यांच्याकडून सुजाता हिने पैसे घेतले. त्यातील ३८ हजार १५३ रुपये परतफेड केली, तर उर्वरित सर्व आर्थिक संस्थांचे ७२ हजार ८४७ रुपये थकीत ठेवले. ते भरण्यासाठी तगादा लावला असता, तुमचे कर्ज तुम्हीच फेडा असे म्हणून धमकी दिली. दरम्यान, ११४ महिलांची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)

कर्ज काढून फसवणूक
रत्नाकर बँक, ग्रामीण कुट्टा, ग्रामशक्ती, आष्टा, आधार फायनान्स, श्रमशक्ती, अस्मिता फायनान्स, सूर्योदय फायनान्स, शिवम बँक, अंबप वाहनधारक पतसंस्था, बी.एस. एस. वडगाव, बोरगाव पतसंस्था, निर्वासी (खासगी) यांच्याकडून विविध महिलांच्या नावे कर्जे घेऊन फसवणूक केलेली आहे.

या संबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’ने याप्रकरणी पाठपुरावा केल्यामुळे गुन्हा नोंद झाल्याचे पीडित महिलांनी सांगितले.

Web Title: 35 lakhs for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.