मालेतील सोसायटीत ३५ लाखांचा ढपला

By Admin | Updated: January 15, 2015 00:37 IST2015-01-15T00:34:11+5:302015-01-15T00:37:37+5:30

बँक निरीक्षक, सचिवाचा प्रताप : निरीक्षकाची तडकाफडकी बदली; चौकशीसाठी लेखापरीक्षकांचे पथक

35 lakhs in Mali society | मालेतील सोसायटीत ३५ लाखांचा ढपला

मालेतील सोसायटीत ३५ लाखांचा ढपला

विश्वास पाटील - कोल्हापूर -पन्हाळा तालुक्यातील माले येथील भैरवनाथ सेवा संस्थेचा सचिव गुलाब सोळसे व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निरीक्षकाने संगनमताने ३५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. बँकेने या गैरव्यवहाराची दखल घेऊन निरीक्षक भरत बाबूराव घाटगे (मूळ गाव आरळे, ता. पन्हाळा) याची उचलबांगडी कागल तालुक्यातील लिंगनूर शाखेत केली आहे. सोसायटीची इमारत बांधण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावांवरील मंजूर पीककर्जाची रक्कम उचलून त्यातून स्वमालकीची जागाखरेदी व गायखरेदीची बोगस प्रकरणे करून हा गैरव्यवहार केला आहे. प्राथमिक चौकशीत हा गैरव्यवहार ३५ लाखांचा असून, त्याची रक्कम वाढण्याची शक्यता जिल्हा बँकेच्या सूत्रांनीही व्यक्त केली. जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनीही या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लेखापरीक्षकांचे पथकच नेमले आहे.
माले येथील भैरवनाथ सोसायटीला स्वमालकीची इमारत नाही; त्यामुळे सोसायटीच्या इमारत बांधणीचा प्रस्ताव होता. त्यासाठी पैसे कोठून उभा करायचे म्हटल्यावर त्याला सचिव व बँक निरीक्षकांनी वेगळीच ‘आयडिया’ दिली. सोसायटीच्या अनेक शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर असते; परंतु सगळेच शेतकरी मंजूर सगळेच पीककर्ज उचलत नाहीत. या दोघांनी त्यांना हे पीककर्ज उचलण्यास सांगितले. पीककर्ज रीतसर मंजूर होते; त्यामुळे ते पैसे मिळण्यात अडचण आली नाही. या पैशांतून सोसायटीसाठी जागा खरेदी करण्याचा निर्णय झाला. ह्या सगळ्या गोष्टी त्या सोसायटीच्या संचालक मंडळालाही मान्य होत्या. किंबहुना त्यांच्या संमतीनेच हा व्यवहार झाला. त्यानुसार मिळालेल्या पैशातून जागा खरेदीचा व्यवहारही झाला; परंतु जागा खरेदी करताना सचिव सोळसे याने ती सोसायटीच्या नावावर न खरेदी करता ती व्यक्तिगत आपल्या नावावर खरेदी केली. काही दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत ती जागा त्याने दुसऱ्यालाच विकल्याचे समजते. याशिवाय सोसायटीतून शेतकऱ्यांच्या नावे बोगस गाय खरेदी प्रकरणे करूनही डल्ला मारला आहे.
या दोन्ही प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक शिरापूरकर व जिल्हा बँकेकडे केली. बँकेने त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्यात तथ्य आढळल्याने
निरीक्षक घाटगे याची तातडीने उचलबांगडी केली; परंतु गैरव्यवहार झाल्यापासून सचिव गायब झाल्याने या व्यवहाराची कागदपत्रेच मिळत नव्हती. आजच तो सचिव पुन्हा हजर झाला असून, सेवा सोसायटीची कागदपत्रे जप्त करण्याचे आदेश बँकेने दिले आहेत. या प्रकरणाचे खरे सूत्रधार दुसरेच कोणी असून, सचिव सोळसे यांचा यात बळी दिला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

तीन गायींना एकच शिक्का
निरीक्षक घाटगे याने सोसायटीच्या माध्यमातून गाय खरेदीसाठी कर्जप्रकरणे केली आहेत. प्रत्यक्षात गायी खरेदी करण्यापेक्षा जुन्याच गायी कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे तीन गायींना एकच शिक्का मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
.कोण हा घाटगे..?
निरीक्षक घाटगे हा पन्हाळा तालुक्यातील माजी आमदारांचा खंदा कार्यकर्ता आहे. तो बँकेच्या कामापेक्षा संबंधित नेत्याचे राजकारणच सांभाळत होता. त्यामुळे या प्रकरणात फारशी कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव होता. त्याचा गाजावाजा होऊ नये यासाठीही त्यांच्याकडून दक्षता घेतली गेल्याचे समजते. जिल्हा बँकेत नोकरी लावतो म्हणून व केडर भरतीतही त्यांच्याकडून गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी बँकेकडे झाल्या आहेत.

Web Title: 35 lakhs in Mali society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.