पोपट पवारकोल्हापूर : कोरोनानंतर व्यायामाबद्दल सध्या सगळेच जागरूक झाले असून योग करण्याकडे नागरिकांचा वाढता कल तयार झाला आहे; पण योग हा तसा अवघड व्यायाम प्रकार असल्याने योगाचे धडे देणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने मात्र ही कमतरता भरून काढली आहे. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या योगाच्या अभ्यासक्रमामुळे गेल्या पाच वर्षांत तब्बल ३०० योगशिक्षक तयार झाले आहेत. हे शिक्षक योग शिकू इच्छिणाऱ्यांना योगाचे धडे देत आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने योग सर्टिफिकेट, योग शिक्षक व एम.ए. योगशास्त्र हे अभ्यासक्रम शिकवले जातात. अगदी २४ वर्षांच्या तरुणांपासून ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत अनेकजण या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. यामध्ये योगशिक्षक हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू झाला असून आतापर्यंत ३०० जणांनी योग शिक्षक अभ्यासक्रम यशस्विरीत्या पूर्ण केला आहे.अभ्यासक्रम पूर्ण केलेले योगशिक्षक आपापल्या परिसरात जाऊन याेगाचे धडे देत आहेत. अनेकांनी याचा व्यावसायिक उपयोग करत योगवर्गही सुरू केले आहेत. एम.ए. योगशास्त्र हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून, यंदाच्या वर्षी याची पहिली बॅच हा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणार आहे.योग प्रात्यक्षिकावर भरआजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या योग अभ्यासक्रमात प्रॅक्टिकलवर अधिक भर दिला आहे. राजारामपुरीत एका हॉलमध्ये सकाळच्या वेळी योगाचे वर्ग भरतात. येथील तीन शिक्षकांद्वारे मार्गदर्शन केले जाते.
असा आहे अभ्यासक्रमअभ्यासक्रम - कालावधी
- योग सर्टिफिकेट ६ महिने
- योग शिक्षक ९ महिने
- एम.ए. योगशास्त्र दोन वर्षे
आताच्या धावपळीच्या जगात नागरिकांना ताणतणावांपासून दूर राहायचे असेल तर योगा करणे गरजेचे आहे. आरोग्यसंपन्न श्रीमंतीकडे जाण्यासाठी हे विद्यापीठातील योगा अभ्यासक्रम शिकणे महत्त्वाचे आहे. - डॉ. रामचंद्र पवार, संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.