केवळ २४ प्रभागात ३०० इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:49+5:302021-01-04T04:20:49+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी केवळ २४ प्रभागांमध्ये ३००पेक्षा जास्त इच्छुक आहेत. हे सर्व प्रभाग सर्वसाधारण असून, हक्काच्या प्रभागात आरक्षण ...

केवळ २४ प्रभागात ३०० इच्छुक
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी केवळ २४ प्रभागांमध्ये ३००पेक्षा जास्त इच्छुक आहेत. हे सर्व प्रभाग सर्वसाधारण असून, हक्काच्या प्रभागात आरक्षण पडल्यामुळे अनेकांनी शेजारील प्रभागात ‘अतिक्रमण’ करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेही इच्छुकांची संख्या वाढली आहे. परिणामी नेत्यांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे ८१ प्रभागांमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरक्षित प्रभागांच्या तुलनेत सर्वसाधारण असलेल्या २४ प्रभागांमध्ये टोकाची इर्षा पाहायला मिळत आहे. एका प्रभागात १२ ते १५ उमेदवार इच्छुक आहेत. पक्षाचे नेते आपल्या जवळचे असल्यामुळे उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असाही त्यांच्याकडून दावा केला जात आहे.
चौकट
नेत्यांसमोर धर्मसंकट
एका पक्षातूनच ६ ते ७ जण इच्छुक असून, यामुळे नेत्यांना उमेदवारी देणे डोकेदुखीची ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत यापैकी काहींनी मदत केली असल्यामुळे त्यांच्यासमोरही धर्मसंकट आहे. यातून बंडखोरीचा धोका निर्माण झाला असून, इच्छुकांची ऐनवेळी माघारीसाठी मनधरणी करताना त्यांची दमछाक होणार आहे.
चौकट
काँग्रेसमध्ये बंडखोरीचा सर्वाधिक धोका
राज्यात सत्ता असल्यामुळे सध्या तरी काही प्रभागांमधील इच्छुकांचा कल काँग्रेसकडे दिसत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची गर्दी होत आहे. यापाठोपाठ राष्ट्रवादीला पसंती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतून संधी मिळाली नाही तर शिवसेना, भाजप, ताराराणी आघाडीचा पर्याय शोधण्याची व्यूहरचनाही यामधील काहींनी आखली आहे.
आम आदमी, मनसे, स्वाभिमानीलाही ‘अच्छे दिन’
प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे आम आदमी पार्टी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ राहील, अशी चिन्हे आहेत. मात्र, या पक्षांकडून उमेदवाराची पार्श्वभूमी तपासूनच त्यांना संधी दिली जाणार आहे. काहीच नाही झाले तर अपक्ष लढण्याचा निर्धारही काहींनी केला असून, आता माघार नाही, अशीच त्यांची भूमिका आहे.
चौकट
चुरशीचे प्रमुख प्रभाग
प्रभाग क्रमांक ९ कदमवाडी, प्रभाग क्रमांक २७ ट्रेझरी ऑफीस, प्रभाग क्रमांक २९ शिपुगडे तालीम, प्रभाग क्रमांक ३१ बाजारगेट, प्रभाग क्रमांक ३३ महालक्ष्मी मंदिर, प्रभाग क्रमांक ३५ यादवनगर, प्रभाग क्रमांक ४६ सिद्धाळा गार्डन, प्रभाग क्रमांक ४७ फिरंगाई, प्रभाग क्रमांक ५४ चंद्रेश्वर, प्रभाग क्रमांक ६१ सुभाषनगर, प्रभाग क्रमांक ६८ कळंबा फिल्टर हाऊस, प्रभाग क्रमांक ७४ सानेगुरुजी वसाहत, प्रभाग क्रमांक ७६ साळोखेनगर, प्रभाग क्रमांक ७७ शासकीय मध्यवर्ती कारागृह, प्रभाग क्रमांक ७८ रायगड कॉलनी बाबा जरगनगर
यादवनगरात तब्बल २५ उमेदवार
यादवनगर प्रभाग सर्वसाधारणमध्ये समाविष्ट असून, येथून सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. तब्बल २५ उमेदवार इच्छुक असून, त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला आहे. येथील निवडणूक अटीतटीची होणार आहे.