पेठवडगाव तालुक्यासाठी ३० ग्रामसभांचे ठराव

By Admin | Updated: May 15, 2015 00:05 IST2015-05-14T21:42:22+5:302015-05-15T00:05:07+5:30

लोकप्रतिनिधींचे पाठबळ नाही : विभाजनाचा प्रस्ताव शासनदरबारी दाखल करूनही वरिष्ठ पातळीवर उदासीनता

30 gram sabhas for Pethavaggaon taluka | पेठवडगाव तालुक्यासाठी ३० ग्रामसभांचे ठराव

पेठवडगाव तालुक्यासाठी ३० ग्रामसभांचे ठराव

दिलीप चरणे -नवे पारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर साळुंखे यांनी सन २००० मध्ये हातकणंगले तालुक्याचे विभाजन होऊन पेठवडगाव स्वतंत्र तालुका व्हावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव प्रथम राज्य शासनाकडे मांडला. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी प्रयत्न केले. तथापि, त्यांच्या प्रयत्नास यश मिळाले नाही. त्यावेळी जनतेची फारशी साथही मिळाली नाही. दरम्यान, आठ वर्षे निघून गेली. हातकणंगले तालुक्याचे विभाजन होऊन पेठवडगाव व इचलकरंजी हे दोन तालुके व्हावेत, अशी मागणी जनतेतूनच जोर धरू लागली.
प्रभाकर साळुंखे यांनी हातकणंगले तालुक्यात फिरुन जनतेची हातकणंगले तालुका विभाजन संदर्भात मते जाणून घेतली. त्यातून ‘नियोजित पेठवडगाव तालुका कृती समिती’ची स्थापना झाली. पेठवडगावचे रौप्यमहोत्सवी नगराध्यक्ष विजयसिंह यादव व ज्येष्ठ कायदेपंडित अ‍ॅड. पी. के. चौगुले (पारगावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली कृती समितीची स्थापना करुन कार्य अधिक गतीमान केले. कृती समितीमध्ये सर्वसमावेशक सदस्यांचा समावेश केला. समितीच्या वतीने पेठवडगाव स्वतंत्र तालुक्याच्या मागणीची जाणीवजागृती करण्यात आली.
हातकणंगले तालुक्यातील ६२ गावांपैकी ३० गावांना १५ आॅगस्ट २०११ रोजीच्या ग्रामसभेत ‘हातकणंगले तालुक्याचे विभाजन होऊन पेठवडगाव स्वतंत्र तालुका व्हावा’ असा एकमुखी ठराव संमत केला. पेठवडगावसह परिसरातील ३ गावांनी पेठवडगाव स्वतंत्र तालुका होण्याच्या मागणीस ठरावाद्वारे बळ दिल्याने कृती समितीनेही कार्याची गती वाढविली.
कृती समितीच्यावतीने १२ मार्च २०१२ रोजी वडगाव येथे तालुक्यातील ३५ गावांतील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांसह विविध पक्ष, सामाजिक संस्थांचा संयुक्त मेळावा विजयसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या मेळाव्यात पेठवडगावला तालुक्याचा दर्जा मिळण्यासाठी व्यापक लढा उभारू व प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नियोजित पेठवडगाव तालुका कृती समितीच्या वतीने २५ डिसेंबर २०१२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी तालुका विभाजनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
दरम्यान, हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाला जनहिताचा रेटा आहे, पण त्याला लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत नाही. सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाच्या मागणीचा फार्स तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून केला जातो. हातकणंगले तालुक्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता हाच तालुका विभाजनातील मोठा अडसर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या जवळच असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तालुका विभाजनाचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. सन १९९९ ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याचे विभाजन होऊन तासगाव व पलूस अशा दोन तालुक्यांची निर्मिती झाली, तर खानापूर तालुक्याचे विभाजन होऊन कडेगाव व खानापूर असे दोन तालुके झाले. येथे लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाल्याने ते शक्य झाले. (समाप्त)


यांनी दिले ठराव
निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, तळसंदे, चावरे, मनपाडळे, वाठार तर्फ उदगाव, मौजे भादोले, मौजे किणी, घुणकी, भेंडवडे, लाटवडे, सावर्डे, खोची, कापूरवाडी, मौजे तासगाव, मौजे वडगाव, संभापूर, टोप, नागाव, वठार तर्फ वडगाव, नरंदे, मिणचे, वडगाव नगरपरिषद, मौजे अंबप, अंबपवाडी, पाडळी, कासारवाडी, शिरोली, सोनार्ली वसाहत.

Web Title: 30 gram sabhas for Pethavaggaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.