23 rupees fine of Rs. 2700 fine, action taken on rickshaw puller | २३ रुपयांच्या लालसेपोटी २७०० रुपये दंड, रिक्षाचालकावर कारवाई
२३ रुपयांच्या लालसेपोटी २७०० रुपये दंड, रिक्षाचालकावर कारवाई

ठळक मुद्दे२३ रुपयांच्या लालसेपोटी २७०० रुपये दंड, रिक्षाचालकावर कारवाईमहिला अधिकाऱ्याची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाई

कोल्हापूर : दत्त मंदीर महाडीक कॉलनी येथून भवानी मंडपपर्यंत आलेल्या महिला प्रवाशाचे मिटरप्रमाणे ७६ रुपये झाले असताना शंभर रुपये घेवून पसार झालेल्या रिक्षाचालकावर शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली. संशयित धनंजय बापुसो काळे (वय ५५, रा. जाधववाडी, मार्केटयार्ड) असे त्याचे नाव आहे. त्याचेकडून सुमारे २७०० रुपये दंड आकारुन त्याची मुजोरी मोडीत काढली. अवघ्या २४ रुपयांच्या लालसेपोटी २७०० रुपये दंड भरायची वेळ रिक्षाचालकावर आली.

महिला प्रवाशी मनिषा आनंदराव देसाई या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपमुखकार्यकारी अधिकारी म्हणून सेवेत आहेत. त्या ५ जूनला माहेरी कोल्हापूरला आल्या असताना हा प्रकार घडला.

अधिक माहिती अशी, मनिषा देसाई या रत्नागिरीहून बसने मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्या. महाडीक कॉलनीतील घरी जाण्यासाठी त्या रिक्षा स्टॉपवर आल्या असता चार-पाच रिक्षावाले कुठे जाणार म्हणून मागे लागले. एका रिक्षावाल्याने मिटरपेक्षा २० रुपये जादा द्यावे लागणार असे सांगितले. मिटरप्रमाणे कोणीच यायला तयार नसल्याने देसाई यांनी शेजारी उभ्या असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीसांना परिस्थिती सांगितली.

एका पोलीसाने रिक्षाचालकाशी चर्चा केलेनंतर त्याने या मॅडम सोडतो असे म्हणून बोलवून घेतले. बसस्थानकावर घरापर्यंत नेहमी ५० रुपये होतात. यावेळी मात्र ७९ रुपये झाले. रिक्षाचालकाने दिलीप जाधव असे नाव सांगुन पैसे घेतले. त्यानंतर दूसऱ्या दिवशी त्या महाद्वाररोडला जाण्यासाठी महाडीक कॉलनी येथून रिक्षा पकडली.

भवानी मंडप येथे आल्या असता मिटरप्रमाणे ७६ रुपये झाले. त्यांनी शंभर रुपयांची नोट दिली. रिक्षाचालकाने सुट्टे पैसे न देता निघून जावू लागला. त्यांनी रिक्षाला धरुन हाक मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुसाट निघून गेला. यावेळी देसाई रस्त्यावर पडून त्यांच्या पायाला दूखापत झाली. देसाई यांना रिक्षाचालकांकडून येणारा अनुभव थक्क़ करणारा होता.

अशी झाली कारवाई

देसाई या मराठा सेवा संघामध्ये काम करतात. त्यांचा कोल्हापूरात मित्र परिवार मोठा आहे. त्यांनी मराठा वॉटसअ‍ॅप ग्रुपवर रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असून त्यांचेकडून प्रवाशांची कशाप्रकारे फसवणूक होती त्याचा स्वत:ला आलेला कटु अनुभवाची पोस्ट टाकली. ती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल गुजर यांचेपर्यंत पोहचली. त्यांनी तत्काळ स्टेशन रोड, भवानी मंडप येथील सीसीटीव्ही फुटेज आणि देसाई यांनी दिलेल्या रिक्षाचा नंबरवरुन (एम. एच. ०९ जे २५५५) वरुन चालकाला शोधून काढले. चौकशीमध्ये त्याने कबुली दिली. त्याचेकडून २७०० रुपये दंड भरुन घेतला. या कारवाईमुळे रिक्षाचालकांची मुजोरी पोलीसांनी मोडीत काढली आहे.
 

 


Web Title: 23 rupees fine of Rs. 2700 fine, action taken on rickshaw puller
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.