सरपंचांसह वीसजणांचा जबाब पूर्ण...
By Admin | Updated: December 10, 2014 23:59 IST2014-12-10T23:22:23+5:302014-12-10T23:59:02+5:30
आमजाई व्हरवडे, पेयजल अपहार : जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे उद्या अहवाल देणार

सरपंचांसह वीसजणांचा जबाब पूर्ण...
आमजाई व्हरवडे : आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेत झालेल्या १३ लाख ५० हजारांच्या अपहाराच्या चौकशीला सुरुवात झाली. पेयजल कमिटीतील सर्व सदस्यांसह सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह २० जणांचे जबाब राधानगरी गटविकास अधिकारी डी. एस. नाईक यांनी पूर्ण केले असून, दोन दिवसांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे हा अहवाल सादर केला जाणार आहे. या प्रकरणात सुभेदार हे कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण राधानगरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
आमजाई व्हरवडे येथील पेयजल योजनेतील ‘लोकमत’ने पर्दापाश केल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. ग्रामसेवकांनी पेयजलचे काम पूर्ण झाल्याचा खोटा दाखला देऊन १३ लाख ५० हजार उचलण्यात हातभार लावल्याचे स्पष्ट होते.
४९ लाख रुपये मंजूर झालेल्या पेयजल योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. योजनेचे काम अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत होता. पंचायत समितीच्या संबंधित विभागाला तक्रार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष होते.
४९ लाखांच्या कामापैकी २० लाखांचे काम अर्धवट असताना ग्रामसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी संगनमताने पेयजल योजनेचे काम पूर्ण झाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून कामाचा सर्व्हे न करता १३ लाख ५० हजारांची रक्कम या योजनेशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तीला दिली. याबाबत पेयजलच्या १४ सदस्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांना लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार सुभेदार यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
आठ दिवस राधानगरीचे गटविकास अधिकारी नाईक यांनीदेखील चौकशी करून ज्या दिवशी १३ लाख ५० हजार रुपये बॅँक आॅफ इंडियाच्या आवळी बु. शाखेतून काढले त्यावेळी कोण कोण होते, यासाठी सीसी टीव्ही फुटेजही तपासले.
येत्या दोन दिवसांत हा गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सादर केला जाणार असून, या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात ग्रामसेवकांपासून अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
आता पाईप्स आल्या... मग काम पूर्ण कसे ?
दरम्यान, ही योजना गेले तीन वर्षे रखडली. पाठोपाठ अपहारही चव्हाट्यावर आला. या प्रकरणात कारवाईला सामोरे जाऊ नये म्हणून अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी योजनेच्या पाईप्स ठेकेदाराने गेल्या चार दिवसांपूर्वी कामाच्या ठिकाणी आणून टाकून काम सुरू असल्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी परिस्थिती असताना ग्रामसेवकाने काम पूर्ण झाल्याचा दाखला दिलाच कसा ? हा प्रश्नही चक्रावून सोडणारा आहे.