१९३ शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात

By Admin | Updated: September 7, 2014 23:25 IST2014-09-07T21:56:10+5:302014-09-07T23:25:58+5:30

शिक्षण विभागाची मोहीम : दहा वर्षांत साक्षरता पाच टक्क्यांनी वाढली

193 Out of school children mainstream | १९३ शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात

१९३ शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात

अंजर अथणीकर-- सांगली --शाळेपासून एकही मूल वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे काम सध्या शिक्षण विभागाकडून सुरू आहे. शाळेत गैरहजर असलेली १९३ मुले शोधून त्यांना आॅगस्टपासून विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे महिला साक्षरतेचे प्रमाण अधिक वाढत आहे.
शिक्षण विभागाने जून ते आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात शाळाबाह्य असणाऱ्या मुलांची शोधमोहीम राबविली. यात सहा ते चौदा वर्षे वयोगटातील १९३ मुले सतत गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यानंतर शिक्षकांना त्या मुलांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांना शाळेत येण्यासाठी विनंती करावी लागली. त्यांच्या समस्या दूर करून त्यांना त्या त्या वर्गात ‘विद्यार्थीमित्र’ प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आॅगस्टपासून या प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली असून, आता हे प्रशिक्षण तीन महिन्यात संपविण्यात येणार आहे. त्यानंतर या मुलांचा इतर मुलांबरोबर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दररोज जादा दोन तासांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. येत्या तीन महिन्यात हे विद्यार्थी शाळेच्या मुख्य प्रवाहात सामील होणार आहेत.
सांगली जिल्ह्याची साक्षरता गेल्या दहा वर्षांत पाच टक्क्यांनी वाढली आहे. दहा वर्षापूर्वी सांगली जिल्ह्याची साक्षरता ७६.६२ टक्के होती, ती आता ८१.४८ टक्के झाली आहे. सध्या पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८८.२२ टक्के, तर महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ७४.५९ टक्के आहे. दहा वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८६.२६, तर महिलांमध्ये ६६.७३ टक्के होते. जिल्ह्यातील साक्षर लोकसंख्या २० लाख ४९ हजार ४६७ असून, दहा वर्षापूर्वी साक्षर लोकसंख्या १७ लाख १७ हजार ८३६ होती.
२७५ मुले बालकामगार शाळेत
वीटभट्टी, बांधकाम क्षेत्र, चहाच्या टपऱ्या येथे आढळणारे बालकामगार शोधून त्यांना शिक्षण देण्याची मोहीम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागाने सुरू केली आहे. जिल्ह्यात दोन वर्षापासून नऊ बालकामगार शाळा सुरू करण्यात आल्या असून यामध्ये २७५ मुले शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह अनेक भत्तेही देण्यात येतात. काही ठिकाणी त्यांच्या राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात साक्षरतेचेही प्रमाण वाढत आहे. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये, याची दक्षताही घेण्यात येत आहे.

गेल्या दहा वर्षात महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक गतीने वाढले आहे. २००१ च्या जनगणनेत महिला साक्षरतेचे प्रमाण ६६.७३ टक्के होते, ते आता आठ टक्क्यांनी वाढून ७६.६२ टक्के झाले आहे. पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण दहा वर्षांत केवळ दोन टक्क्यांनी वाढले आहे. दहा वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८६.२६ टक्के होते, तर आता ते ८८.२२ टक्के आहे.

Web Title: 193 Out of school children mainstream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.