कोल्हापुरात १८/११ चा थरार...

By Admin | Updated: November 19, 2015 01:14 IST2015-11-19T00:52:33+5:302015-11-19T01:14:08+5:30

पोलिसांची रंगीत तालीम : पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्टार बझारमध्ये प्रात्यक्षिक; नागरिकांची तारांबळ

18/11 thunder in Kolhapur ... | कोल्हापुरात १८/११ चा थरार...

कोल्हापुरात १८/११ चा थरार...

कोल्हापूर : वेळ सकाळी साडेदहाची... नेहमीपेक्षा बुधवारी रस्त्यावर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती. अचानक टेंबलाई परिसरातील स्टार बझारमध्ये अंदाधुंद गोळीबार करीत सहा अतिरेकी घुसले असून, त्यांनी कर्मचाऱ्यांसह ग्राहकांना ओलीस ठेवल्याचा निनावी दूरध्वनी पोलीस कंट्रोल रूमला आला अन् पोलीस यंत्रणेची पळापळ अन् धावपळीचा एकच थरार सुरू झाला.
अवघ्या पंधरा मिनिटांत सशस्त्र पोलिसांची फौज घटनास्थळी पोहोचली. पटापट चालत्या गाडीतून उड्या मारत त्यांनी स्टार बझार परिसराला वेढा दिला. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून अतिशय सावधपणे जलद कृती दलाचे जवान व पोलिसांनी प्रवेश केला. आतमध्ये तोंडाला माकडटोप्या घालून फिरणारे सहा अतिरेकी नजरेस पडले. यावेळी पोलीस व अतिरेक्यांत चकमक उडाली. यामध्ये एक अतिरेकी ठार झाला, तर आणखी एक जखमी झाला. अन्य चौघेजण शरण आले. हा थरार सुमारे दीड तास सुरू होता. बाहेर लोक श्वास रोखून बसले होते. काही वेळाने अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी स्मितहास्य करीत सर्वांना ही रंगीत तालीम असल्याचे सांगितले. त्यानंतर श्वास रोखून बसलेल्या पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास घेतला.
पॅरिस येथील दहशतवादी हल्ल्यांंच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला अतिदक्षतेच्या सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस यंत्रणेची सतर्कता पडताळण्यासाठी शहरात रंगीत तालीम घेतली.
दिवाळी सुटीनिमित्त स्टार बझार येथे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. बुधवारी सकाळची वेळ असल्याने बहुतांश पोलीस अधिकारी व कर्मचारी घरीच होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमीच होती. काहींची ड्यूटीवर येण्यासाठी लगबग सुरू होती. अचानक स्टार बझार येथे अतिरेकी हल्ला झाल्याचा निनावी दूरध्वनी कंट्रोल रूमला येताच ड्यूटीवर असलेल्या पोलिसांची बोबडीच वळली. कंट्रोलने त्वरित ही माहिती बॉम्बशोधक पथकासह शहरातील पोलीस ठाण्यांना दिली. पोलीस मुख्यालयातून अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, क्राईम ब्रँच, बॉम्बशोध पथक, राज्य राखीव दल, स्पेशल कमांडर, जलद कृती दलाचे जवान, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, बीट मार्शल, अग्निशामक दल, रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक असा लवाजमा काही मिनिटांतच स्टार बझार परिसरात पोहोचला. स्टार बझारला चारही बाजूंनी वेढा घालून जलद कृती दलाचे काही जवान व सशस्त्र पोलिसांचे पथक मुख्य दरवाजातून इमारतीत घुसले. आतमध्ये कर्मचारी व ग्राहक स्तब्ध होऊन उभे होते. माकडटोप्या घातलेले सहा अतिरेकी हातामध्ये सशस्त्र बंदुका घेऊन फिरत होते. यावेळी पोलीस व अतिरेक्यांत चकमक उडाली व यात एक अतिरेकी ठार, तर एक जखमी झाला. चौघे शरण आले. जखमी अतिरेक्याला सशस्त्र पोलीस बंदोबस्तामध्ये रुग्णवाहिकेत बसविण्यात आले. तेथून ही रुग्णवाहिका सायरन वाजवत सीपीआरच्या दिशेने गेली. हा थरार पाहून रस्त्यावरील नागरिक श्वास रोखून होते. मार्गावरील सर्व वाहतूक काहीवेळ बंद करण्यात आली होती. बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढत सापडलेले दोन बॉम्ब निकामी केले. पोलिसांचे हे रंगीत तालमीचे आॅपरेशन यशस्वी झाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांना कॉल दिला.
या आॅपरेशनमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, गृह पोलीस उपअधीक्षक अनिल पाटील, भारतकुमार राणे, अमर जाधव, नीलेश सोनवणे, माधव पडिर्ले, पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, अमृत देशमुख, अरविंद चौधरी, संदीप भागवत, सहा. पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, जलद कृती दल, शहर उपविभागीय, अशा जवळपास ११५ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
 

अतिरेकी हल्ला झाल्यास तो थोपविण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे का? याची चाचणी घेण्याच्या सूचना सर्व पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. त्यानुसार बुधवारी स्टार बझार येथे रंगीत तालीम घेण्यात आली.
- डॉ. मनोजकुमार शर्मा,
पोलीस अधीक्षक
नागरिक भयभीत
स्टार बझार परिसराला पोलिसांनी घातलेला सशस्त्र घेराव आणि त्यांची घालमेल पाहून काहीतरी घडल्याची जाणीव नागरिकांना झाली. अतिरेकी हल्ला झाल्याचे समजताच त्यांना धडकीच बसली. सुमारे दीड तास आॅपरेशन सुरूहोते. तोपर्यंत नागरिक श्वास रोखून बसले होते.
गोळीबाराचा बनाव
स्टार बझारमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. हा संपूर्ण प्रसंग चित्रपटातील दृश्याप्रमाणे दाखविण्यात आला. आॅपरेशनमध्ये गोळीबार व नकली अतिरेकी घुसल्याचा बनाव करण्यात आला होता. तसेच स्टार बझारच्या व्यवस्थापन प्रशासनास कल्पना दिली होती.
ये तो डेमो था भाई...
या चकमकीबाबत घटनास्थळी जमलेल्या नागरिकांत कमालीची उत्सुकता होती. ते श्वास रोखून हा सारा प्रकार पाहात होते. मिशन यशस्वी झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चैतन्या यांनी स्मितहास्य देत, ‘ये तो डेमो था भाई’, असे म्हटल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

Web Title: 18/11 thunder in Kolhapur ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.