वस्त्रोद्योगासाठी १७०० कोटी : हाळवणकर
By Admin | Updated: March 19, 2016 00:28 IST2016-03-19T00:28:05+5:302016-03-19T00:28:25+5:30
वस्त्रोद्योगात नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगाबरोबरच जुन्या उद्योगांसाठीसुद्धा व्याज अनुदानाचा लाभ घेता येईल.

वस्त्रोद्योगासाठी १७०० कोटी : हाळवणकर
इचलकरंजी : वस्त्रोद्योगाला होणाऱ्या कर्जपुरवठ्यावर व्याजदराची सवलत आणि विजेच्या सवलतीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. त्यावरील प्रतिक्रिया आमदार हाळवणकर यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे. यामध्ये ते म्हणतात, वस्त्रोद्योगासाठी २६५ कोटींच्या तरतुदीपैकी व्याजाच्या अनुदानाकरिता १०० कोटींची तरतूद आहे. वस्त्रोद्योगात नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगाबरोबरच जुन्या उद्योगांसाठीसुद्धा व्याज अनुदानाचा लाभ घेता येईल. यंत्रमागाला सवलतीच्या दराने वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी १६०० कोटी, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांमध्ये सुधारणा करण्यासाठी आमदार हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशी यापूर्वी शासनाला सादर केल्या होत्या. त्याप्रमाणे केंद्राच्या तांत्रिक उन्नयन (टफ्स) योजनेतील अनुदानाशिवाय नवीन उद्योग घटकांसाठी राज्य सरकारचे २५ ते ३५ टक्के अनुदान एकरकमी मिळणार आहे.
रुकडी पुलासाठी ११ कोटींची तरतूद
इचलकरंजी ते कोल्हापूर हे अंतर सुमारे दहा किलोमीटरने कमी करण्यासाठी पंचगंगा नदीवर रुकडी येथील पुलाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. या पुलासाठी शासनाने ११ कोटींची तरतूद शुक्रवारच्या अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे गेली आठ वर्षे आपण केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, कोल्हापूरला दररोज जाणाऱ्यांंची वेळ, पैशाची बचत होणार आहे, असे हाळवणकर यांनी स्पष्ट केले आहे.